
डेक्कन ओडीसी प्रा. लिमिटेड या कंपनीच्या गेस्ट हाऊसच्या रुममध्ये महिलेच्या डोक्यात कीचन ट्रॉली घालून खून करुन पलायन करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली*.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील डेक्कन ओडीसी प्रा. लिमिटेड या कंपनीच्या गेस्ट हाऊसच्या रुममध्ये महिलेच्या डोक्यात कीचन ट्रॉली घालून खून करुन पलायन करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मारुती राजाराम मोहिते (वय ५५, रा. घुणकी, ता. हातकळंगले, जि. कोल्हापूर) असे महिलेचा खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ही घटना १४ डिसेंबर २०२० ला दुपारी तीन ते चार कालावधीत डेक्कन ओडीसी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गेस्ट हाऊसच्या रुममध्ये घडली. आरोपी मारुती मोहिते व मृत महिला ही गेस्ट रुममध्ये असताना तिच्या पतीचा फोन आला. या रागातून आरोपी मोहिते यांने रुममधील किचन ट्रॉली डोक्यात घातली.
रक्ताच्या थारोळ्या बेशुद्ध अवस्थेत पडली असताना आरोपीने घटनास्थळावरुन पलायन केले. कंपनीच्या त्या रुममध्ये कंपनीचा कामगार आल्यानंतर त्याला ही वस्तू स्थिती दिसली. तत्काळ महिलेला उपचारासाठी जयगड उर्जा हॉस्पिटल येथे दाखल केले होते. त्यानंतर रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील निर्मल हॉस्पिटल व त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध भादवी कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना १६ डिसेंबरला तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत महिलेचे चुलत सासरे रवींद्र वझे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादवी ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक नितीन ढेरे करत होते.
तपासात पोलिसांनी संशयितास अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सोमवारी (ता. २८) या खटल्याचा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात झाला. नाजूक विषयातून झालेल्या खून प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. पुष्पराज शेट्ये १९ साक्षिदार तपासले. यामध्ये सरकारी कर्मचारी तसेच रत्नागिरीतील निर्मल हॉस्पिटलचे डॉ. चौधरी, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. कुंभरे आदींचा समावेश आहे. न्यायालयाने आरोपी मारुती मोहिते याला भादवी ३०२ अन्वेय जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तसेच भादवी कलम ३४३ अन्वये दोषी ठरवून न्यायालायाने १ वर्षे कैद व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.