एसटी महामंडळावर केले संशोधन; गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या चिन्मय प्रभूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या चिन्मय प्रभू यांची मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील अन्वेषण संशोधन स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळवले आहे.
प्रा. सी. ए. अजिंक्य राजीव पिलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी महामंडळाचे पुनरुत्थान/पुनरुज्जीवन करण्यासाठीचे सूचक मॉडेल या विषयावर प्रकल्प त्यांनी सादर केला आहे. प्रतिवर्षी राष्ट्रीय स्तरावरील अन्वेषण संशोधन स्पर्धा घेतली जाते ज्यात भारतातील सर्व विद्यापीठे सहभागी होतात. या प्रतिष्ठेच्या स्पधेत दर्जेदार संघ निवडताना मुंबई विद्यापीठ त्यांच्याशी संलग्न असलेल्या सुमारे 781 महाविद्यालयातून संशोधन प्रकल्प निवडते. यावर्षी सर्व महाविद्यालयातून केवळ 5 संशोधन प्रकल्प हे अन्वेषण संशोधन स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठ संघात निवडले गेले असून त्यात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा प्रकल्प समाविष्ट आहे. राष्ट्रीय स्तरावर संशोधन स्पर्धेत सहभागी होण्याची महविद्यालयाची ही दुसरी वेळ आहे.
मॉडेलमधे महाराष्ट्र एस. टी. महामंडळाचा तोटा होण्यामागची कारणे अभ्यासली आहेत आणि त्यावरून त्यांचा लोड फॅक्टर म्हणजे प्रति बस मागे प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येतील हे दाखवले आहे. तसेच प्रति किलोमीटर उत्पन्न वाढवण्यासाठी, एकूण खर्च कमी करण्यासाठी आणि महाराष्ट्र एस. टी. महामंडळासाठी नवीन उत्पन्नाच्या संधी कोणत्या असतील ते दाखवले आहे. भारतात 37 एस. टी. महामंडळापैकी उत्तर प्रदेश एस. टी. महामंडळ आणि पंजाब एस. टी. महामंडळ हे केवळ नफ्यामध्ये आहेत. बाकी 35 महामंडळ तोट्यात चालली आहेत. त्यामुळे मॉडेल फक्त महाराष्ट्र एस. टी. महामंडळापुरते उपयुक्त नाही तर भारतातील तोट्यात चालणार्‍या सर्व 35 एस. टी. महामंडळांसाठी आहे. त्यांना ही माहिती व मॉडेल त्यांचा जुना तोटा भरून काढून आणि भविष्यातील कामगिरी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल.
सदर स्पर्धेसाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी , उपप्राचार्य डॉ. एम. आर. साखळकर, वाणिज्य विद्याशाखा प्रमुख डॉ. यास्मिन आवटे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सोनाली कदम आणि संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. मयूर देसाई यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यार्थ्याचे व त्यांच्या मार्गदर्शक प्राध्यापकाचे संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पा पटवर्धन, सेक्रेटरी सतीश शेवडे व इतर पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button