
गॅस टर्मिनल्स उभारणार, जिंदल कंपनी ठाम तर ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.
जयगड परिसरातील गॅस टर्मिनल उभारणीला विरोध होत असला तरी आता काम थांबवणे शक्य नाही. त्यामुळे जयगड येथे गॅस टर्मिनलची उभारणी करणारच असे जिंदल कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून नांदिवडे ग्रामस्थ, प्रदूषणविरोधी संघर्ष समिती यांना सांगण्यात आले. त्यामुळे आता ग्रामस्थ व संघर्ष समितीनेही आक्रमक पवित्रा घेतला असून यासंदर्भात लवकरच आंदोलन पुकारले जाईल असा इशारा दिला आहे.आंबूवाडी फाटा, नांदिवडे येथील गॅस टर्मिनलबाबत ग्रामस्थ व संघर्ष समितीने विरोध दर्शवत १४ एप्रिलपासून ग्रामस्थांकडून धरणे आंदोलन करण्यात येत होते. यावेळी कंपनी अधिकार्यांनी गॅस टर्मिनलच्या कामाला स्थगिती देत २५ रोजी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करण्यास तयारी दर्शविली होती. त्यानुसार ग्रामस्थांकडून धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेताच कंपनीकडून २२ पासून गॅस टर्मिनलच्या कामाला सुरूवात केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत होता. तसेच कंपनीकडून आपली फसवणूक करण्यात आली, अशी भावना ग्रामस्थ व संघर्ष समिती यांच्यात निर्माण झाली होती. दरम्याने कंपनीकडून नियोजित बैठक २५ रोजी पार पडेल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार नांदिवडे ग्रामस्थ, प्रदूषणविरोधी संघर्ष समिती यांच्याशी चर्चा करण्यासाठी जिंदल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जयगड येथे आले होते. शुक्रवारी सायंकाळी जयगड येथे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.www.konkantoday.com