आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयांचा २१वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने १७ ऑगस्ट रोजी आपल्या स्थापनेची २१ वर्षे पूर्ण केली. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री श्री. रवींद्र माने यांचा या दिवशी ६१ वा वाढदिवस. त्यामुळे महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी हा दिवस दुग्धशर्करा योगच असतो.

आंबव ग्रामदैवता कालीश्री देवीचे दर्शन घेतल्यानंतर मा. माने साहेब यांचे महाविद्यालयामध्ये आगमन झाले. यावेळी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये त्यांच्या सौभाग्यवती नेहा माने व अन्य सवाष्णीनी भारतीय परंपरेनुसार त्यांचे वाढदिवसानिमित्त औक्षण करून अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, सचिव चंद्रकांत यादव, सहसचिव दिलीप जाधव, खजिनदार जयश्री दळवी, सदस्य जान्हवी माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रा. नितीन भोपळे, जिल्ह्यातील राजकीय नेतेमंडळी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

राजेंद्र माने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी प्रास्ताविक करताना प्रथम सर्वांचे स्वागत केले व महाविद्यालयाच्या वतीने मा. रवींद्रजी माने यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या मागील एकवीस वर्षाच्या दैदिप्यमान कामगिरीचा त्यांनी आढावा घेत यशस्वी वाटचालीची उपस्थिताना माहिती दिली. यावेळी त्यांनी जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेली महाविद्यालयाची एम एच ०८ टीम, विद्यापीठ स्तरावरील युवा महोत्सवामध्ये मिस्टर युनिवर्सिटी रनर अप किताब मिळविणारा महाविद्यालयाचा विद्यार्थी ओमकार कुलकर्णी यांचा विशेष उल्लेख केला. संस्थेच्या सदस्या जान्हवी माने यांनीही नुकतीच सिंबॉयसिस, पुणे येथून जिओ इनफॉरमॅटीक्समधून आपली एम टेक पदवी पूर्ण केली. या सर्वांचा यानिमित्ताने संस्थाध्यक्ष मा. माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, व विद्यार्थ्यांनि मा. माने यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयांतर्गत “बेस्ट टीचर” व “डिपार्टमेंट एक्सलंन्स अवार्ड” या दोन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मेकॅनिकल विभागातील डॉ. राहुल दंडगे यांना बेस्ट टीचर म्हणून गौरविण्यात आले. तर मागील वर्षभरात विविध पातळीवर केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल मेकनिकॅल विभागाला डिपार्टमेंट एक्सलंन्स अवार्ड ने सन्मानित करणेत आले. विभागप्रमुख डॉ. सचिन वाघमारे व विभागीय प्राध्यापकांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यानंतर या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्याना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी एम एम एस विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या “स्टार्ट अप सेंटर“ चे मा. माने साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रा. सुदर्शन जाधव, प्रा. मोहन गोसावी यानी या कामी पुढाकार घेतला. महाविद्यालयाच्या एन एस एस विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचेही उद्घाटन करण्यात आले. रत्नागिरी येथील सरकारी रक्तपेढीच्या सहकार्याने घेतलेल्या या शिबिरात विद्यार्थी व कर्मचा-यानी यानंतर रक्तदान करून ४० बाटल्या रक्त जमा केले.

मा. रविन्द्रजी माने वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारताना आपल्या भाषणात म्हणाले कि, मागे वळून बघताना मला आनंद होतो आहे. जेव्हा शैक्षणिक क्षेत्रात काम करायचं ठरवलं तेव्हा आईचा भक्कम पाठिंबा लाभला आणि त्याच जोरावर आजचं हे विश्व उभं राहिलं. यापुढे नव्या जोमाने नव्या पध्दतीने कार्यमग्न रहाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाच्या यशात भागीदार असणा-या सर्वाचे यावेळी त्यांनी आभार मानले.

सायंकाळी संस्थेच्या विविध अशा पाच शाळा, विद्यालय व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनि मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आणि समारंभाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button