
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जिल्ह्यातील ८०० लाभार्थ्यांची रेल्वे अयोध्येला रवाना सुरक्षित जा, सुरक्षित या पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिल्या शुभेच्छा.
रत्नागिरी, दि. 26 : आपल्या घरातलं कुटुंब हे प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला निघालेले आहे. आपल्याला आशीर्वाद मागण्यासाठी हे सर्वजण निघालेले आहेत. अशा पध्दतीची वागणूक ही सर्व ज्येष्ठांना मिळाली पाहिजे. कुठच्याही ज्येष्ठ नागरिकाला त्रास होणार नाही, त्यांना कोणतेही कमतरता भासणार नाही, याची काळजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे संगून, सुरक्षित जा, सुरक्षित या, अशा शुभेच्छा पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिल्या.
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरुन 800 ज्येष्ठ नागरिकांना अयोध्याला तीर्थ दर्शनासाठी घेऊन जाणारी कोकणातील पहिली रेल्वे आज रवाना झाली. पालकमंत्री डॉ. सामंत यांनी फित कापून या उपक्रमाचा शुभारंभ आज केला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जनसंपर्क अधिकारी संजय भोसले, असिस्टन्ट मॅनेजर टुरिझम संजय शर्मा, प्रादेशिक व्यवस्थापक शैलेश बापट, प्रांताधिकारी जीवन देसाई, राहूल पंडित, जि.प. माजी सभापती बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, जातानाचा अडीच दिवसाचा प्रवास आणि येतानाचा अडीच दिवसाचा प्रवास आहे. जसे घरामध्ये मुले आईवडीलांना जी सेवा करतात, मुले ज्याप्रमाणे आईवडीलांची काळजी घेतात, त्यापेक्षा जास्त काळजी आपण सर्वांनी या सगळ्या ज्येष्ठांची घ्या. त्यांच्या आयुष्यातला हा आनंदाचा दिवस आहे. जे आपल्या सर्वांचे स्वप्न होते ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. त्या राम मंदिराचे, त्या रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्याला रवाना होत आहात. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टरांसोबत आरोग्य पथक पाच दिवस आपल्या सोबत राहणार आहे. आपण स्वत:ही आपली काळजी घ्या. तसेच मला पूर्ण खात्री आहे, कर्मचारी अधिकारी आपण सगळे आमचे आईवडील असल्याप्रमाणे आपल्या सर्वांची काळजी घेतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते म्हणाले, 60 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मुलांवर अवलंबून न राहता तीर्थ दर्शन व्हावे, यासाठी प्रत्येकी 30 हजार देऊन तीर्थ दर्शन योजना करावी, हा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला होता. आज आपल्या जीवनतला सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे. कारण, कोकणातून पहिली रेल्वे आपल्या सर्वांना घेऊन अयोध्याला रवाना होते. पाण्याची, जेवण्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे. स्वच्छताही ” चांगली असली पाहिजे. अजून निधीची आवश्यकता लागत असेल तर जिल्हा नियोजन समितीमधून ज्येष्ठांसाठी आजच मंजूर करायला आपण तयार आहोत, परंतु 1 तारखेला झेंडा वंदनासाठी रत्नागिरीला येईन तेव्हा, घरच्यांपेक्षा जास्त चांगली काळजी या प्रवासात आमची घेतली गेली, असे मला सर्व ज्येष्ठांनी सांगितले पाहिजे.
मला जमलं तर पुन्हा येत असताना तुमच्या स्वागताला देखील तुमचा मुलगा म्हणून या रेल्वे स्टेशनला मी उपस्थित राहण्याची प्रयत्न करीन. मला शक्य झाल नाही तर अधिकारी, माझे पदाधिकारी नक्की उपस्थित राहतील. सुरक्षित जा, सुरक्षित या, अशा शुभेच्छा पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिल्या. पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दोन तीन दिवसांपूर्वी काश्मीरला जो प्रकार घडला त्याचा जाहीर निषेध केला.
यावेळी तीर्थ दर्शन योजनेचा लाभ मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा तुळशीमाळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रातनिधिक स्वरुपात पालकमंत्री महोदयांच्या हस्ते अयोध्याला जाण्यासाठीची रेल्वे तिकीटही देण्यात आली.