
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात खेड नगर परिषद राज्यात चौथी
खेड : शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या पाच राज्यातून खेड नगर परिषदेला नवव्या क्रमांकाचा बहुमान, तर महाराष्ट्र राज्यातून चौथा क्रमांक प्राप्त झाला आहे. नगर परिषदेच्या कचरा प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले असून, शहरातून गोळा होणार्या कचर्याची विल्हेवाट लावताना नगर प्रशासनाची दमछाक होत आहे. मात्र उपलब्ध साधनसामुग्रीसह स्वच्छता कर्मचार्यांच्या मदतीने येथील नगर परिषद ओल्या व सुक्या कचर्याची योग्य विल्हेवाट लावत शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. खेड नगर परिषद कोकणात क वर्ग नगर परिषदांमध्ये सरस ठरत देशपातळीवर कचरामुक्त शहरासाठी 36 वे मानांकन प्राप्त केले होते. याशिवाय गतवर्षीच स्वच्छ सर्वेक्षण अभियानात झोनमध्ये सोळावा तर राज्यात नववा क्रमांक प्राप्त केला होता. तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, देवानंद ढेकळे, प्रमोद ढोरजकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, माजी आरोग्य सभापती प्रशांत कदम, स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर व सर्व माजी नगरसेवक, अधिकारी व स्वच्छता कर्मचार्यांच्या योगदानातून शहरात उपक्रम राबविण्यात आले.