भारताची कठोर भूमिका अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश


पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले आहेत.या हल्ल्यानंतर कोणताही आडपडदा न ठेवता भारताने हल्लेखोरांना पाकिस्तानचा असलेला थेट पाठिंबा यावरुन प्रहार केला. भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर थेट आरोप केला आहे. भारताने पाकिस्तानी दूतावास बंद करण्यास सांगितल असून पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचललं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले. ही सीसीएस बैठक अडीच तास चालली. त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएसए अजित डोभाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीएस बैठकीत काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, सीसीएस निर्णयात सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच अटारी बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्क अंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणारी व्हिसा सूट रद्द करण्यात आली आहे आणि त्याअंतर्गत, भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. भारतातील सर्व पाकिस्तानी लष्करी सल्लागारांनाही एका आठवड्याच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. भारताने इस्लामाबादमधून सल्लागारांनाही परत बोलावले आहे. उच्चायुक्तालयांची एकूण संख्या ३० पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींनी दिली निर्णयांची माहिती

१. पाकिस्तानसोबत असलेला १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत हा करार स्थगित करण्यात आला आहे.

२. अटारी चेक पोस्ट तात्काळ बंद करण्यात येत आहे. ज्यांनी वैध परवानगी घेऊन या मार्गाने सीमा ओलांडली आहे ते १ मे २०२५ पूर्वी त्याच मार्गाने परत येऊ शकतात.

३. सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पूर्वी जारी केलेले सर्व एसव्हीईएस व्हिसा अवैध मानले जातील. सध्या या व्हिसावर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडावा लागेल.

४. नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई दल सल्लागारांना ‘पर्सोना नॉन ग्राटा’ (नको असलेली व्यक्ती) घोषित करण्यात आले आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

५. भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून आपले संरक्षण, नौदल आणि हवाई दल सल्लागार मागे घेत आहे. संबंधित उच्चायुक्तालयांमध्ये ही पदे रद्द मानली जातील.

दरम्यान, सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दुसरीकडे, पहलगामच्या बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी श्रीनगर आणि दिल्लीत अनेक बैठका झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button