
पूजेसाठी गावी येणाऱ्या भाविकांचा टेम्पो ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला.
डोंबिवलीहून दापोली तालुक्यातील निगडे गावी पूजेसाठी येत असलेल्या एका टेम्पो ट्रॅव्हल्सचा खेर्डी पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला. या अपघातात चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, १७ आसनी टेम्पो ट्रॅव्हल्समधून सहा महिला, सहा पुरुष आणि तीन लहान मुले प्रवास करत होते.दापोलीतील निगडे येथे जात असताना खेर्डी पेट्रोल पंपाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या मोठ्या खड्ड्यात गेली आणि उलटली.या अपघातात गुरुनाथ सखाराम धुरी (वय ३८), विराज भरत धुरी (वय २४), भाग्यश्री भरदरी (वय ४०) आणि सुनीता सखाराम धुरी (वय ७०) हे चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले.