
जर राज ठाकरे तेव्हा पक्षाचे अध्यक्ष झाले असते तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते- रामदास कदम
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर राजकीय नेते मंडळींच्या प्रतिक्रिया येत आहेत.
आता शिवसेना शिंदे (पक्षाचे) नेते रामदास कदम यांनी यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी रामदास कदम यांनी एक मोठं विधान केलं. ‘आमच्याकडून एक चूक झाली. महाबळेश्वरला जेव्हा उद्धव ठाकरेंना पक्षाचं अध्यक्ष केलं, तेव्हा राज ठाकरेंना अध्यक्ष करायला हवं होतं’, असं रामदास कदम यांनी वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.
रामदास कदम काय म्हणाले?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. याबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, “दोन्ही ठाकरे एका व्यासपीठावर, एका ठिकाणी येणार असतील तर नक्कीच मराठी माणसांचं हित आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले पाहिजेत हे माझं मत आजही आणि आधीही होतं. खरं तर मी आणि बाळा नांदगावकर आम्ही दोघांनी दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत”, असं रामदास कदम यांनी म्हटलं.
“राज ठाकरे यांनी अनेकवेळा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाळी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, दुर्देवाने उद्धव ठाकरे यांनी होकार दिला नाही. त्यावेळी उद्धव ठाकरे माझ्याकडे असं म्हणाले होते की, एक म्यान में दो तलवार नही रखते. हे वाक्य उद्धव ठाकरे यांचं होतं. तेव्हा राज ठाकरे यांची मागणी काय होती? तर माझ्याकडे फक्त दोन जिल्ह्याची जबाबदारी द्या. एक पुणे आणि नाशिक, बाकी उद्धव ठाकरे यांनी सर्व सांभाळावं. तरीही उद्धव ठाकरे नाही बोलले”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
“आता उद्धव ठाकरे यांच्यावर अशी वेळ आलेली आहे की त्यांच्या हातातून सर्वच गेलेलं आहे. आता सगळं अवकाश फाटलं आहे. मग अशा परिस्थितीत राज ठाकरे जर येत असतील तर मग त्यांचा आधार घेऊन आपल्याला राजकारणात डोकं वर काढता येईल का? हा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा असावा. मी त्या दोघांनाही जवळून पाहिलेलं आहे. राज ठाकरे हे स्पष्ट बोलणारे आहेत. पण उद्धव ठाकरे हे आतल्या गाठीचे आहेत. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना कधीच पुढे येऊन देणार नाहीत. अटी-शर्ती घालण्याचा प्रश्न कुठे येतो? तुम्ही दोघे भाऊ आहात ना?”, असं रामदास कदम म्हणाले आहेत.खरं तर त्यावेळी आमच्याकडून एक चूक झाली. मी आता अधिक स्पष्ट बोलणार नाही. पण महाबळेश्वरला जेव्हा उद्धव ठाकरे यांना पक्षाचं अध्यक्ष केलं, तेव्हा आम्ही राज ठाकरे यांना अध्यक्ष करायला हवं होतं. ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक आहे. जर राज ठाकरे तेव्हा पक्षाचे अध्यक्ष झाले असते तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते. शिवसेना फुटली नसती”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.