
रत्नागिरीतील महिलेची 2 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
रत्नागिरी : वीज बिल अपडेट झालेले नसून त्यासाठी एक अॅप डाऊनलोड करा, असे सांगून प्रौढेची सुमारे 2 लाख 11 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. राहुल चतुर्वेदी आणि दीपक शर्मा या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 16 जुलै रोजी सायंकाळी 5.30 ते 7.30 वा. कालावधीत टीआरपी येथे घडली आहे. त्यांच्या विरोधात सविता श्रीपाद नाटेकर (वय 59, रा. घागमठ टीआरपी समोर, रत्नागिरी) यांनी बुधवारी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 16 जुलै रोजी सायंकाळी अज्ञात क्रमांकावरून त्यांना फोन आला. फोन करणार्याने फोन बिल उपडेट झालेले नाही. त्यासाठी प्ले स्टोअरमधून क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करा, असे सांगितले. नाटेकर यांनी अॅप डाउनलोड केले. त्यानंतर या दोन संशयितांनी त्यांच्याकडून माहिती घेत 2 लाख 11 हजार रुपये लाटले. याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.