
ST कर्मचाऱ्यांच्या PF गुंतवणुकीवरील 100 कोटी रुपये व्याज बुडीत- श्रीरंग बरगें.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील 87000 कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली 1240 कोटी रुपयांची रक्कम एसटीने पी. एफ.ट्रस्टमध्ये भरली नसल्याने गुंतवणुकीवरील अंदाजे 100 कोटी रुपये इतकी व्याजाची रक्कम बुडाली असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ व ग्र्याजुटीचे दोन स्वतंत्र ट्रस्ट असून 87 हजार एसटी कर्मचारी व अधिकारी यांचा भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची अंदाजे 1240 कोटी रुपये व उपदान म्हणजे ग्र्याजुटीची अंदाजे 1105 कोटी रुपये इतकी रक्कम अशी मिळून अंदाजे 2345 कोटी रुपयांची रक्कम फेब्रुवारी 24 पासून एसटीने दोन्ही ट्रस्टकडे भरणा केलेली नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली पी. एफ. ची रक्कम पीएफ ट्रस्टकडे भरणा केली जाते व ट्रस्ट ही रक्कम गुंतवणूक करते.
त्यावरील येणाऱ्या व्याजातून कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर सदरची रक्कम 8.25 टक्के इतक्या दराने परत करण्यात येते. पण गेले अनेक महिने एसटीने सदरची रक्कम गुंतवणूक केली नसल्याचे त्यावरील व्याज व चक्रवाढ व्याज बुडाले असून त्याचा फटका साहजिकच कर्मचाऱ्यांना बसणार आहे. संपा नंतर शासनाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लागणारी पूर्ण रक्कम राज्य सरकार कडून एसटीला देण्यात येईल असे शपथपत्र न्यायालयात दिले आहे. पण त्यानंतर कधीही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. परिणामी पीएफ ट्रस्ट अडचणीत सापडली असून इ.पी. एफ. ओ. ऑफिसने काही नियम, अटी व शर्ती घालून सदर ट्रस्टला मान्यता दिली असून त्यांनी घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत आहे. इ. पी. एफ. ओ.ने ट्रस्टवर कारवाई केल्यास कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ शकते अशी शंकाही बरगे यांनी व्यक्त केली आहे.