
जयगड येथील जिंदलच्या गॅस टर्मिनल विरोधातील आंदोलन सुरूच
जिंदल कंपनीच्या माध्यमातून नांदिवडे येथे उभारण्यात येत असलेल्या गॅस टर्मिनल विरोधात प्रदूषण विरोधी संघर्ष समिती नांदिवडे यांची तहसीलदार तसेच जिंदल कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दुसर्या दिवशी मंगळवारी भेट घेतली.आंदोलनकर्त्या ग्रामस्थांशी संवाद साधला. मात्र, लेखी पत्र दिल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले.
गॅस टर्मिनलच्या विरोधात प्रदूषण विरोधी संघर्ष समिती नांदिवडे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलनात उतरली आहे. येथील गॅस टर्मिनलला ग्रामस्थांचा विरोध नाही तर येथे सुरू असलेले या प्रकल्पाचे कामकाज लोकवस्तीतून हटवण्यात यावे, तोपर्यंत ग्रामस्थांचे हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मंगळवारी दुसर्या दिवशी या आंदोलनकर्त्यांची तहसिलदार राजाराम म्हात्रे आणि जिंदल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी ऑपरेशन हेड समीर गायकवाड यांनी भेट घेतली. पण आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करून याबाबत निर्णय दिला जाईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना कंपनीमार्फत देण्यात आल्याचे संघर्ष समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.