
सिंधुदुर्गात धुडगूस घालणाऱ्या हत्तीला पकडण्यासाठी कर्नाटकातून येणार ‘प्रशिक्षित हत्ती’.
सिंधुदुर्गातदोडामार्ग तालुक्यात काही दिवसांपूर्वी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली होती. मोर्ये गावात एका जंगली हत्तीनं अचानक हल्ला चढवत एका स्थानिक शेतकऱ्याचा जीव घेतला. या घटनेमुळं संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांमध्ये वन विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.मृत शेतकरी लक्ष्मण गवस हे काजू बागायतीत काजू गोळा करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान जंगलातून आलेल्या एका जंगली हत्तीने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हत्तीच्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.दुर्घटनेनंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालत जोरदार नाराजी व्यक्त केली. जंगली हत्तीला पकडण्याची लेखी हमी मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
अखेर वन विभागाने लेखी स्वरूपात हत्तीला ताब्यात घेण्याचं आश्वासन दिल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्यात आला.घटनास्थळी आढळलेल्या पाऊलखुणांच्या आधारे संबंधित हत्ती ‘ओंकार’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओंकार हा एक निमवयस्क टस्कर हत्ती आहे. या हत्तीची एक विशेष ओळख म्हणजे त्याचे इतर हत्तींपेक्षा मोठे आणि लांब दात ज्यामुळे तो अधिक ताकदवान आणि आक्रमक मानला जातो. स्थानिकांमध्ये या हत्तीला ‘बारक्या’ या टोपणनावानेही ओळखले जाते.सध्या या धोकादायक हत्तीला पकडण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी कर्नाटक राज्यातून कुमकी हत्ती बोलावले जाणार आहेत. कुमकी हत्ती हे विशेष प्रशिक्षित हत्ती असतात, जंगली हत्तींना नियंत्रणात आणण्यासाठी या हत्तींची मदत घेतली जाते.कुमकी हत्तींना विशिष्ट प्रशिक्षण देऊन शांत बनवले जाते. याच कुमकी हत्तींनी पूर्वी अनेक वेळा जंगली हत्ती पकडण्यासाठी यशस्वी मोहिमा पार पाडल्या आहेत. आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष ओंकार हत्तीच्या हालचालींकडे लागले आहे.कुमकी हत्तींच्या सहाय्याने ओंकार हत्तीला सुरक्षितरीत्या पकडता येईल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि वन विभाग यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.