
तोतया पोलीस बनून आंबा व्यापाऱ्याला सातारा-रत्नागिरी मार्गावर लुटले एक लाखांहून अधिकची रक्कम केली लंपास
. आपण पोलिस असल्याचे सांगून तो तया पोलीस बनुन रत्नागिरी जिल्ह्यातील एका आंबा व्यापाऱ्याला गाडीची तपासणी करण्याच्या हेतूने गाडी थांबवून त्याच्याकडील एक लाखाहून अधिक रक्कम लंपास केल्याची घटना पुणे सातारा रोडवर घडली आहेआंब्याच्या पेट्या खाली करून गावी परतणाऱ्या कोकणातील एका पिकअप चालकाला पोलीस गणवेशातील दोघा अज्ञात व्यक्तींनी दिवसाढवळ्या लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक लाखाहून अधिक रुपयांची रक्कम चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रीतम काशिनाथ ओरपे (२७ वर्षे, रा. लाजूळ, रत्नागिरी) हे त्यांच्या भावाच्या मालकीची महिंद्रा मॅक्स बोलेरो पिकअप (क्रमांक MH08AP 8537) मधून त्यांचे मित्र सुयोग नारायण लिंगायत यांच्यासोबत आंब्याच्या पेट्या भरून लाजूळ (रत्नागिरी) येथून पुणे येथे ९ एप्रिल रोजी रात्री ११:३० वाजता निघाले होते. १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता ते पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डात पोहोचले. त्यांनी तेथे त्यांचे भाऊ नितीन काशिनाथ ओरपे यांना बोलावून घेतले आणि तिघांनी मिळून लाजूळहून आणलेल्या आंब्याच्या पेट्या मार्केट यार्डातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या गाळ्यात उतरवल्या. त्यानंतर गाडीतील रिकामे कॅरेट भरून त्यांनी चहा-नाश्ता केला.यावेळी प्रीतम यांचे भाऊ नितीन यांनी पहिल्या खेपेतील विकलेल्या आंब्याचे १ लाख १३ हजार रुपये कॅश एका कॅरीबॅगमध्ये भरून प्रीतम यांच्या गाडीतील क्लीनर सीटखाली असलेल्या बॉक्समध्ये ठेवले. त्यानंतर प्रीतम आणि सुयोग हे दोघेही त्यांची पिकअप घेऊन सकाळी ९:३० वाजता पुण्याहून निघाले.पिकअप कात्रज रोड, खेडशिवामार्गे शिरवळ पास करून जात असताना, सुमारे ११:२५ वाजता सातारा-रत्नागिरी मार्गावर गाडीच्या मागून दोन अनोळखी इसम हंटर बुलेटवरून आले आणि त्यांनी हाताने गाडी बाजूला घेण्याचा इशारा केला. सुयोग यांनी तात्काळ गाडी बाजूला थांबवली. त्या अनोळखी इसमांनी त्यांची बुलेट सुमारे १०० फूट मागे ठेवली आणि ते प्रीतम यांच्या गाडीजवळ आले. त्यांनी स्वतःची ओळख पोलीस म्हणून दर्शवण्यासाठी ओळखपत्र दाखवले आणि गाडीची तपासणी करायची असल्याचे सांगितले.त्यानंतर त्या दोघांनी प्रीतम आणि सुयोग यांना गाडीतून खाली उतरवून पिकअपच्या पाठीमागे नेले. तेथे एका व्यक्तीने त्याच्याकडील डायरीत प्रीतम आणि सुयोग यांचे नाव, पत्ता लिहिण्याचे नाटक केले, तर दुसरा इसम गाडीची तपासणी करतो असे सांगून केबिनजवळ गेला. त्याचवेळी रोडवर आणखी एक व्यक्ती इलेक्ट्रिक स्कूटर सर्व्हिस रोडला लावून गाडीजवळ आला आणि तोही गाडी तपासणीच्या बहाण्याने पाहू लागला.प्रीतम यांनी त्यांच्या गाडीत काहीही नसल्याचे सांगितल्यावरही त्यांनी तपासणीचा केवळ देखावा केला आणि नंतर सांगितले की गाडीत काही नाही, तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे प्रीतम आणि सुयोग गाडी घेऊन पुढे निघाले. थोड्या अंतरावर गेल्यावर प्रीतम यांच्या लक्षात आले की त्यांनी ठेवलेली पैशांची बॅग तपासावी. म्हणून त्यांनी गाडी बाजूला घेऊन पाहिले असता, सीटखाली ठेवलेली पैशांची कॅरीबॅग गायब होती. त्यामुळे घाबरलेल्या प्रीतम यांना ते इसम पाठोपाठ येत असावेत असा विचार आला आणि ते थोडा वेळ थांबले.परंतु त्यांना ते इसम आणि त्यांची वाहने कुठेही दिसली नाहीत. त्यामुळे त्यांनी तात्काळ ११२ या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर दोन पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे