
दहावी व बारावी जुलै-ऑगस्टच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नं. 17 भरण्याची सुविधा.
रत्नागिरी, दि.12 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, असे विभागीय कोकण विभागीय मंडळ सचिव सुभाष चौगुले यांनी कळविले आहे.
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी/शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.सद्यस्थितीत फक्त फेब्रुवारी-मार्चच्या परीक्षांसाठीच खासगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तथापि, अनेक विद्यार्थी पात्र असूनही मंडळाने दिलेल्या मुदतीत नावनोंदणी अर्ज भरू न शकल्याने अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून यावर्षी प्रथमच जुलै-ऑगस्ट २०२५ च्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्याकरिता नाव नोंदणीसाठी संधी देण्यात येत आहे.जुलै-ऑगस्ट २०२५ परीक्षेसाठी खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नावनोंदणी अर्जाबाबतची कार्यवाही 15 एप्रिल 2025 पासून सुरु करण्यात येत असून सदर अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावरुन भरावयाचे आहेत.
जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म नं.17 ऑनलाईन स्वीकारणे विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन प्रिंट आऊट घेणे. ऑनलाईन नावनोदणी शुल्क जमा अर्जाची प्रत केल्याबाबत पोच पावतीची प्रिंट आऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे ही प्रक्रिया 15 एप्रिल ते 15 मे या कालावधीत करावयाची आहे. ——-