
घुसखोरी करणार्या परप्रांतीय नौकांवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडणार – वेस्टकोस्ट पर्ससीन मच्छिमार संघटनेचे कार्याध्यक्ष नासीर वाघू.
रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात सात ते आठ नॉटीकलमैल अंतराच्या आत येवून परप्रांतीय मच्छिमार नौका मासेमारी करत आहेत. स्थानिक मच्छिमारांना लक्ष्य करणार्या ड्रोनसह सिमाशुल्क विभाग, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आणि त्यांच्या अंमलबजावणी विंगचे लक्ष कुठे आहे? घुसखोरी करणार्या या परप्रांतीय नौकांवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राज्य वेस्टकोस्ट पर्ससीन मच्छिमार संघटनेचे कार्याध्यक्ष नासीर वाघू यांनी दिला आहे. संपूर्ण कोकण पट्टीवर ही खुलेआम घुसखोरी होवून सर्व मासा पकडून नेला जात असल्याचेही कार्याध्यक्षांनी सांगितले.रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे.
जिल्ह्यातील 3 हजार 174 मच्छिमार नौका असून त्यातील 2 हजार 515 यांत्रिकी नौका आहेत. या मासेमारीवर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. अशा या जिल्ह्याच्या समुद्रात कर्नाटक, गुजरात, गोवा, केरळच्या अद्यावत नौका घुसखोरी करून सात ते आठ नॉटीकल मैलच्या आत मासेमारी करत आहेत. आधीच स्थानिक मच्छिमार असलेल्या पारंपरिक, पर्ससीन, गिलनेट नौकाना व छोट्या होड्यांना मासा मिळत नाही. रोजच्या रोज खर्च अंगावर पडत असताना परप्रांतीय नौका रोजच्या रोज राज्याच्या जलधीक्षेत्रात घुसखोरी करत आहेत.
या परप्रांतीय नौकाना घुसखोरी करून मासेमारी करण्याचा परवानाच दिला आहे काय? असा सवालही कार्याध्यक्ष वाघू यांनी उपस्थित केला.स्थानिक मच्छिमारांवर कारवाई करताना कोणताही सहानुभूती दाखवली जात नाही. त्याचवेळी परप्रांतीय नौकांवर मात्र कारवाई करताना आखडता हात घेतला जात आहे. ड्रोन, मत्स्य व्यवसाय विभाग, कस्टम विभाग या घुसखोरीला का रोखू शकत नाही? स्थानिक मच्छिमारांवर मासळी मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता परप्रांतीय नौकांवर कारवाई होण्यासाठी आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.