आंब्यापाठोपाठ काजू पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंताग्रस्त

रत्नागिरी : जिल्ह्याच्या अर्थार्जनात मोठा वाटा असलेल्या काजूवर फळमाशीसदृश रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. टरफलापासून गरापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कीटकनाशकाची फवारणी करूनही फारसा प्रभाव जाणवत नाही. कीड लागलेला काजू बाजारात चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यात १ लाख ११ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. उत्पादनक्षम क्षेत्र ९४ हजार ६८० हेक्टर आहे. हेक्टरी उत्पादकता १.५० टन असून, दरवर्षी १ लाख ४२ हजार २० मेट्रिक टन काजूचे उत्पादन होते.

आंबा लागवडीप्रमाणे काजू लागवडीसाठी बागायतदारांना विशेष परिश्रम घ्यावे लागत नसल्याने काजू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. योग्य खत व्यवस्थापन असल्यास चांगले उत्पादन मिळते.मात्र, सध्या नैसर्गिक बदलाचा परिणाम काजू पिकावरही झाला आहे. टीम माॅस्क्युटोसारख्या कीडरोगाचा प्रादुर्भाव आधी होता. परंतु, आता फळमाशीसदृश किडीचा प्रादुर्भाव झाला. यावर्षी काजूबीला सर्वोच्च दर मिळाला. हंगामाच्या सुरुवातीला १८० रुपये किलो दराने बी खरेदी केली जात होती. गेल्या पाच वर्षातील हा उच्चांकी दर आहे. मात्र, जसजशी आवक वाढली तसतशी दरात घसरण सुरू झाली. सध्या १५० ते १६० रुपये काजूला दर मिळत आहे. यावर्षी काजूचे उत्पादन चांगले आहे, दरही चांगला होता. मात्र, कीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button