हत्तींमुळे होणारे नुकसान आणि मृत्यूचे तांडव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व सत्ताधारी जबाबदार -ठाकरे गटाचे नेते माजी आमदार वैभव नाईक.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात दोन दिवसांपूर्वी हत्तीच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यावरून वन मंत्री गणेश नाईक यांनी एकच हत्ती पकडण्यासंदर्भात आदेश दिले होते.या आदेशावरून आता सिंधुदुर्गात संताप व्यक्त केला जात असून ठाकरे गटाचे नेते माजी आमदार वैभव नाईक यांनी टीका केली आहे. वैभव नाईक यांनी, वनमंत्र्यांचा असा आदेश म्हणजे थट्टाच असल्याचे म्हटलं आहे. ते मोर्ले येथे हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या लक्ष्मण यशवंत गवस यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेऊन सांत्वन केल्यानंतर बोलत होते.

यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, दोडामार्ग नगरसेवक चंदन गावकर, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, संदेश वरक, युवासेना उपतालुकाप्रमुख सिद्धेश कासार, सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे, विभाग प्रमुख संतोष मोर्ये, महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, महिला उप तालुकाप्रमुख नयनी शेटकर, प्रेमानंद ठाकूर, शुभंकर देसाई, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात दोन दिवसांपूर्वी एका हत्तीनं शेतकऱ्यांवर हल्ला केला. काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यावर हत्तीने हल्ला केला. ज्यात शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस (वय.७०) यांचा मृत्यू झाला. यामुळे दोडामार्गातील शेतकरी भीतीच्या छायेखाली आले आहेत. वनविभागाने मयत शेतकरी लक्ष्मण गवस (70) यांच्या कुटुंबियांना 10 लाख रूपये मदत दिली आहे.

या मदतीच्या रक्कमेसह वन मंत्री गणेश नाईक यांनी एकच हत्ती पकडण्यासंदर्भात दिलेल्या आदेशावरून आता शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. याच आदेशावरून वैभव नाईक यांनी वन मंत्री गणेश नाईक यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.वैभव नाईक यांनी, मोर्ले येथील शेतकरी लक्ष्मण गवस यांच्या घरी जाऊन यांचे बंधू, मुलगा विनय यांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सरकारने हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना पंचवीस लाखांची मदत देण्याचे जाहीर केले होते. पण गवस कुटुंबीयांना वनविभागाने दहा लाखांची मदत दिली आहे. उर्वरीत रक्कम देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन मृताच्या वारसांशी भेट घेवून दिले आहे. तर वनमंत्र्यांनी एकच हत्ती पकडण्यासंदर्भात आदेश काढून शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.तर फक्त एकच हत्ती नाही तर सर्वच हत्तींना पकडण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जाईल. यासाठी हा मुद्दा विधानसभेतही मांडला जाईल, यासाठी आमदार अंबादास दानवे यांच्याशी चर्चा करू असेही वैभव नाईक यांनी स्पष्ट केले. तसेच ग्रामस्थांकडून यावेळी, हत्ती पकड मोहीम राबविण्यासंदर्भात शासनाकडे मागणी करण्यात आली होती.

मात्र शासन उदासीन असल्याचे दिसत होते, असा आरोप त्यांनी केला आहे. हत्तींमुळे होणारे नुकसान आणि मृत्यूचे तांडव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व सत्ताधारी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी सर्व हत्तींना पकडण्याची मोहीम राबवावी. यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले जाणार आहे. तसेच वनविभागाचे प्रधान वनसंरक्षक यांच्यासोबत बैठकही घेतली जाणार आहे. मात्र आता यापुढे अशी घटना घडल्यास मोठे आंदोलन उभारू असा इशारा यावेळी नाईक यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button