
रत्नागिरी तालुक्यातील रिंगी फाटा ते सांडेलावगण रस्त्याबाबत ग्रामस्थ आक्रमक.
रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण न केल्यास १५ एप्रिल रोजी ग्रामस्थांसह ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा.
रत्नागिरी : तालुक्यातील रिंगी फाटा ते सांडेलावगण या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या ६.३७ किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामावरून आक्रमक झाले असून, याबाबतची कैफियत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मांडली होती. ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली असून याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना दिले आहे. संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याविरोधात तेथील स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी १५ एप्रिल रोजी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
याला ठाकरे शिवसेनेने पाठिंबा दिला असून लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने काम करेल, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला आहे.यावेळी ठाकरे सेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, युवासेना तालुकाप्रमुख तथा शिवसेना शहर संघटक प्रसाद सावंत, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, विभाग प्रमुख मयूरेश्वर पाटील यांच्यासह चाफेरीतील ग्रामस्थ उपस्थित होते. रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी, कासारी, सांडेलावगण अंतर्गत रस्ता सन २०२२ मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. ६.३७ किलोमीटर अंतराचा हा रस्ता असून याठिकाणी सुमारे २ हजार ५०० लोकवस्ती आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होण्याचा कालावधी १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत होता; मात्र संबंधित ठेकेदाराने २०२४ मे महिन्याच्या शेवटी रस्ता रुंदीकरणाचे काम चालू केले.
त्यानंतर पावसाळ्यात काम बंद होते. नोव्हेंबर महिन्यात पाऊस गेल्यानंतर आज अखेरपर्यंत या ठेकेदाराने पुढील काम चालू केलेले नाही. रस्त्याची स्थिती पाहता या रस्त्यावरून वाहनाने एखादा आजारी रुग्णही नेता येणार नाही. रिक्षाही या ठिकाणापर्यंत जात नाही. तसेच या रस्त्याला कायमस्वरूपी अपघात होत असतात. त्यामुळे आता लोकांचे वाहतुकीच्या दृष्टीने जगणे अवघड होत चालले आहे.याबाबत चाफेरी गावच्या सरपंच सौ. अंजली अमोल कांबळे यांच्यासह सुधाकर रघुनाथ महाकाळ, प्रकाश शांताराम नाचरे, संजय पांडूरंग पवार, नंदकुमार बारक्या बेंद्रे आदी ग्रामस्थांनी संबंधित विभागाचे डेप्युटी इंजिनीयर श्री. माने यांची भेट घेऊन त्यांना रस्ता बनवण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती.
यावेळी भेटीत डेप्युटी इंजिनीयर श्री. माने यांनी आम्ही ग्रामपंचायतमध्ये येऊन सविस्त चर्चा करू, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे ते १७ मार्च २०२५ रोजी चाफेरी ग्रामपंचायतीमध्ये चर्चा करण्यासाठी आले होते. त्या दिवशी ३०० ग्रामस्थ ग्रामपंचायत चाफेरीमध्ये उपस्थित होते. या रस्त्याला आमची कोणतीही हरकत नसल्याने उद्यापासून तुम्ही रस्त्याचे काम सुरू करा असे यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी सांगितले. तसेच कोणी या कामात अडथळा आणल्यास आम्ही तिथे हजर राहू, असे आश्वासनही दिले. त्यानंतर चाफेरी सरपंचांसह सर्व ग्रामस्थ श्री. माने यांच्यासोबत रस्ता पाहणी करण्यासाठी गेलो. रस्ता घराजवळून जात असेल तर त्या दरीला चिऱ्याने बांधी बांधून द्या असे सांगितले. यावेळी श्री. माने यांनी हे आमच्या एस्टिमेटमध्ये नसल्याचे सांगत एस्टिमेट फक्त खडीकरण, डांबरीकरण, आणि रुंदीकरण एवढेच आहे अशी उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच ग्रामस्थांनी हा रस्ता कधीपासून चालू करणार असे विचारले असता श्री. माने यांनी आम्ही ग्रामपंचायतीत पत्र देतो असे सांगितले आणि तिथून पळून गेले. यासंदर्भात डेप्युटी इंजिनीयर श्री. माने यांनी अद्यापही ग्रामपंचायतीत पत्र दिलेले नाही.
या सर्व प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांचा संताप वाढत असून, कायद्याच्या चौकटीत राहून १५ एप्रिल रोजी आंदोलन करणार असल्याची भूमिका घेतली आहे. याबाबतची कैफियत या ग्रामस्थांनी ठाकरे शिवसेनेकडे मांडली असता ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. तसेच याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांच्याकडे दिले असून रिंगी फाटा ते सांडेलावगण रस्त्याच्या कामाला त्वरित सुरुवात करावी अन्यथा आंदोनल करावे लागेल, असा इशारा दिला आहे.