
कशेडी भुयारी मार्गातील वायूविजनचे काम सुरू लवकरच भुयारी मार्गावर वाहतूक सुरु होण्याची शक्यता
खेड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू असून सध्या एका भुयारातील वायुविजनाचे म्हणजेच एअर व्हेंटीलेशनचे काम सुरू झाले आहे. या दोन भुयारांपैकी एका भुयाराची चाचणी पावसाळयापूर्वी केली जाण्याची शक्यता असून या भुयारातून वाहतूक सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तीन पदरी असलेल्या एकाच भुयारांमध्ये समोरासमोर वाहतूक सुरू ठेवणे धोक्याचे असल्याचे मत तज्ज्ञांने व्यक्त केले असल्याने दोन्ही भुयारे एकाचवेळी सुरू करण्याचाही निर्णय होण्याची शक्यता असल्याचे मुख्य प्रकल्प अधिकारी अमोल शिवतारे यांनी मह्द्यमांशी बोलताना सांगितले
मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी रायगड जिल्ह्यात इंदापूर ते वडपाले 24 कि.मी., वीर ते भोगाव खुर्द 40 कि.मी.,भोगाव खुर्द ते खवटी 14 कि.मी. 500 कोटी रूपये अंदाजे खर्च तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील 44 कि.मी. रस्ता चौपदरीकरण अंदाजे खर्च 579 कोटी रूपये, चिपळूण तालुक्यातील 38 कि.मी. रस्ता चौपदरीकरण अंदाजे खर्च 670 कोटी रूपये, संगमेश्वर तालुक्यातील 40 कि.मी. रस्ता चौपदरीकरण अंदाजे खर्च 592 कोटी रूपये (आरवली आणि सोनवी), रत्नागिरी ते लांजा 51 कि.मी. रस्ता चौपदरीकरण अंदाजे खर्च 826 कोटी रूपये, राजापूर तालुक्यातील 35 कि.मी. रस्ता चौपदरीकरण अंदाजे खर्च 660 कोटी रूपये (राजापूर आणि वाकेड), याखेरिज, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील 38 कि.मी. रस्ता चौपदरीकरण अंदाजे खर्च 450 कोटी रूपये , कुडाळ तालुक्यातील 44 कि.मी. रस्ता चौपदरीकरण अंदाजे खर्च 579 कोटी रूपये ( ,असे हे सात भाग असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यापैकी रायगड जिल्ह्यातील वीर ते भोगाव खुर्द 40 कि.मी. महामार्ग आणि भोगाव खुर्द ते खवटी 1.7 कि.मी भुयारी मार्ग हे दोन महत्वाचे टप्पे पोलादपूर व खेड तालुक्याशी संबंधित आहेत.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चे चौपदरीकरण सुरू असून या कशेडी घाटामध्ये रस्त्याचे चौपदरीकरण शक्य नसल्याने भारतीय पध्दतीचा भुयारी मार्ग खणून रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घाटातील प्रस्तावित 3.44 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. कशेडी घाटातील प्रस्तावित बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविताना तीन पदरी दोन भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत.
दोन्ही भुयारी मार्गांची एकत्र जोडणी राहण्यासाठी कनेक्टीव्हीटीचा भुयारी मार्ग पूर्ण झाला आहे. आतील भागात युटर्न घेणार्या वाहनांसह अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची सुविधा या कनेक्टिव्हिटी भुयारी मार्गाने होणार आहे. यासोबत आपत्कालामध्ये उपयुक्त असलेले वायुविजन म्हणजे व्हेंटीलेशनच्या सुविधेचे एक भुयार तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. कशेडी भागातील डोंगरातून या भुयारी मार्गाचे व्हेंटीलेशनचे उभे भुयार थेट डोंगरावर चौथरा करून बांधले जाणार असून या वायुविजन भुयारामधून हवा येऊ शकेल; मात्र पावसाचे पाणी अथवा संततधार भुयारी मार्गात कोसळणार नाही, असे व्हेंटीलेशनचे स्वरूप असणार आहे.