
चीनमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर १०४ टक्के इतका मोठा कर लादण्याची घोषणा ट्रम्प प्रशासनाने केली
आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला मोठा धक्का दिला आहे. चीनमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर १०४ टक्के इतका मोठा कर लादण्याची घोषणा ट्रम्प प्रशासनाने केली आहे. या निर्णयाची व्हाईट हाऊसने पुष्टी केली असून ८ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून हे नवीन शुल्क लागू होणार आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
अमेरिकेने चीनवर १०४ टक्के कर लादल्याच्या निर्णयाची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. दरम्यान, अमेरिकेने आधी चीनवर ३४ टक्के आयात शुल्क लावलं होतं. मात्र, अमेरिकेने चीनवर लादलेल्या या ३४ टक्के आयात शुल्कानंतर चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर ३४ टक्के आयात शुल्क लावण्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, चीनने अमेरिकेच्या वस्तूंवर ३४ टक्के आयात शुल्क लावण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला होता की चीनने ८ एप्रिलपर्यंत ३४ टक्के कर मागे घेतला नाही तर अमेरिका ५० टक्के अतिरिक्त कर लादेल.दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीपुढे चीनने झुकण्यास नकार दिला. तसेच जशास तसे उत्तर देण्याची भूमिका चीनने घेतली होती. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला मोठा धक्का देत चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर १०४ टक्के इतका मोठा कर लादण्याची घोषणा केली आहे.