
जागतिक आरोग्य दिनी कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाच्या हार्टफुलनेस ध्यानयोग शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी * : संस्कृती मंत्रालय भारत सरकार आणि श्री रामचंद्र मिशन हार्टफुलनेस यांच्या सहकार्याने कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या हार्टफुलनेस ध्यानयोग शिबिराचा शुभारंभ आज जागतिक आरोग्य दिनी उत्साहात करण्यात आला. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांबरोबरच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हार्टफुलनेस ध्यानयोग प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर सुधीर आकोजवार आणि सौ संगीता आकोजवार यांनी या शिबिरात हार्टफुलनेस ध्यान योगाद्वारे तणावरहित आनंदी जीवन, परिवारिक स्वास्थ्य, एकात्मता आणि अध्यात्मिक उन्नती असा हृदयाचा प्रवास कसा अनुभवता येतो याचे प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले. हे ध्यानयोग शिबिर 9 एप्रिल पर्यंत कुवारबाव ज्येष्ठ नागरिक भवनात सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत चालणार असून शिबिर यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे सदस्य योग प्रशिक्षक श्री. गणपत खामकर आणि ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. श्यामसुंदर सावंत देसाई, सुधाकर देवस्थळी यांचे सहकार्य लाभत आहे.