
ज्येष्ठांसाठी जिल्ह्यातील पहिली हेल्पलाईन सेवा कुवारबांवमध्ये
शहरानजिकच्या कुवारबांव ग्रामपंचायतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्ह्यातील पहिली हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे रात्री अपरात्री देखील ज्येष्ठांना सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्काळ मदत पुरविली जाणार आहे. जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
कुवारबांव ज्येष्ठ नागरिक संघ व ग्र्रामपंचायत कुवारबांव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठीचा हेल्पलाईन नंबर १८००-२३३२-६८५ असा ठेवण्यात आला आहे. हा उपक्रम ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, अन्य ग्रामपंचायत व त्या क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आदर्शवत ठरणारा असल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सांगितले.
हा कक्ष २४ तास सुरू राहणार आहे. या योजनेंतर्गत ज्येष्ठांच्या घरामध्ये पाणीपट्टी, घरपट्टी भरण्यासाठी कोणी उपलब्ध नसेल तर ग्रामपंचायत कर्मचारी ही बिले भरून देतील. रात्रीच्या वेळी कोणत्याही स्वरूपाची तातडीची वैद्यकीय मदत भासल्यास दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी श्री जय भैरी मित्रमंडळ, मिरजोळे कुवारबांव यांच्या सहकार्याने मिरजोळेचे माजी सरपंच राजेश तोडणकर यांची रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे.
www.konkantoday.com




