अ‍ॅड. पटवर्धन भाजपतर्फे भरणार 12 ला अर्ज

रत्नागिरी- नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार अ‍ॅड. दीपक पटवर्धन येत्या गुरुवारी (ता. 12) सकाळी शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरणार आहेत. या वेळी भाजप कोकण प्रभारी आमदार प्रसाद लाड, ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे, माजी खासदार डॉ. नीलेश राणे उपस्थित राहणार आहेत.
सुसंस्कृत आणि सुशिक्षित व नागरिकांचे प्रश्‍न जाणणारे उमेदवार म्हणून सुपरिचित असणार्‍या पटवर्धन यांना शहरातून पाठिंबा मिळत असल्याचे शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी सांगितले. अर्ज भरण्यापूर्वी भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय येथे सकाळी 11 वाजता एकत्र जमावे. त्यानंतर अर्ज भरण्यात येणार आहे. या वेळी भाजप जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेने ही पोटनिवडणूक रत्नागिरीवासियांवर लादली आहे. त्यामुळे भाजपने या निवडणुकीत पटवर्धन यांच्या रूपाने तगडा उमेदवार दिला असून ही निवडणूक जिंकायचीच यासाठी सारी ताकद लावली आहे. माजी खासदार डॉ. नीलेश राणे हेसुद्धा या निवडणुकीत प्रचाराची कमान सांभाळणार आहेत.शहरामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे, रस्त्यांवरही अनेक ठिकाणी खड्डे आहेत, तात्पुरती मलमपट्टी करून शहरवासियांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. फवारणी न केल्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शहरात परिवर्तन घडवण्यासाठी नागरिक सज्ज आहेत. चांगले रस्ते, शहराची स्वच्छता, मुबलक पाणी, रोजगार, पर्यटन यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील राहणार आहे असे ते म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button