
चित्रपटांच्या चित्रीकरणातून मागील वर्षभरात मध्य रेल्वेच्या तिजोरीत तब्बल 40.13 लाख रुपयांची भर
मध्य रेल्वेने 2024-25 या सरत्या आर्थिक वर्षात चित्रपटांच्या चित्रीकरणातून चांगलीच कमाई केली असून मागील वर्षभरात मध्य रेल्वेच्या तिजोरीत तब्बल 40.13 लाख रुपयांची भर पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि आपटा स्थानकाला चित्रपट निर्मात्यांची सर्वाधिक पसंती मिळाली असून पनवेल, लोणावळा, खंडाळा, वाठार, सातारासारखी स्थानके तसेच तुर्भे व वाडीबंदर रेल्वे यार्ड ही ठिकाणेही हॉटस्पॉट ठरली आहेत.मध्य रेल्वेने 2024-25 या आर्थिक वर्षात चित्रपटाच्या चित्रीकरणांसाठी विविध परिसर आणि रेल्वे कोच देऊन 40.13 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे. विविध ठिकाणी चित्रपट निर्माते आणि धर्मा प्रोडक्शन्ससारख्या आघाडीच्या निर्मिती संस्थांनी 3 नेटफ्लिक्स चित्रपट, 2 वेब सीरिज, 1 प्रादेशिक चित्रपट आणि 1 जाहिरात चित्रपट असे सुमारे 7 चित्रीकरण केले. कथा पिक्चर्स प्रोडक्शनच्या ‘गांधारी’ चित्रपटाच्या चित्रीकरणातून सर्वाधिक 17.85 लाख रुपये मिळाले, तर धर्मा प्रोडक्शनच्या ‘आप जैसा कोई’ चित्रपटाच्या चित्रीकरणातून 8.12 लाख रुपये मिळाले. हे दोन्ही चित्रपट आपटा स्थानकावर चित्रीत झाले. हे स्थानक पूर्वी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘मुन्ना मायकल’ यांसारख्या प्रतिष्ठत चित्रपटांसाठीचे पहिल्या पसंतीचे ठिकाण होते. नैसर्गिक सौंदर्यामुळे आपटा स्थानक सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे एकूण 3 चित्रीकरणे झाली असून त्यातून एकूण 27.57 लाख रुपये उत्पन्न मिळाले, जे चित्रीकरणातून झालेल्या एकूण उत्पन्नाच्या 68 टक्के आहे.