
खेड तालुक्यातील काडवली-गजवाडी येथून १० लाख रुपये किंमतीचे जेसीबी साहित्य चोरल्याप्रकरणी पोलिसांनी केली आरोपींना नांदेड येथून अटक.
खेड तालुक्यातील काडवली-गजवाडी येथून १० लाख रुपये किंमतीचे जेसीबी साहित्य चोरल्याप्रकरणी येथील पोलिसांनी नांदेड येथे गजाआड केलेल्या देवराव बाबुराव धोत्रे (३९ रा. शिवाजीनगर-नांदेड), सुरेश रामू दांडेकर (वसर्ली-नांदेड) यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले आले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. चिरणी-धनगरवाडी येथील जंगलमय भागात लपवून ठेवलेले सर्व साहित्य येथील पोलिसांनी हस्तगत केले.प्रल्हाद प्रकाश लाड यांनी काडवली गजवाडीत नवीन सार्वजनिक विहिरीच्या खोदाई कामासाठी नवीन जेसीबी मशिन ठेवले होते.
३ टन वजनाच्या मशिनसह इतर सुटे भाग चोरट्यांनी लंपास केले होते. त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील अटकेतील एक संशयित देवराव धोत्रे हा प्रल्हाद लाड यांच्याकडे कामाला होता. तर दुसरा संशयित नांदेड येथून येथे आला होता. यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला होता. येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपासाला गंती देत पोलिसांचे एक पथक नांदेड येथे पाठवले होते. याचा दोन्ही संशयितांना सुगावा लागताच दोघेही पळून जाण्याच्या तयारीत होते.पथकाने दोघांच्याही नांदेड बसस्थानकात मुसक्या आवळल्या.