
पोलिसांच्या गस्तीमुळे गुहागर किनारा पर्यटकांना सुरक्षित
गुहागरात दरवर्षी हजारोच्या संख्येने पर्यटक येतात. सहा किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या या किनाऱ्यावर इलेक्ट्रिक सायकलची गस्त सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे गुहागर किनाऱ्यावरील पर्यटकांना पोलिसांचे सुरक्षा कवच मिळणार आहे.गुहागर समुद्रकिनाऱ्यावर नगरपंचायतीच्या वतीने सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. त्याचबरोबर बंदर विभागाच्यावतीने दोन सुरक्षारक्षक आहेत. या सुरक्षारक्षकांबरोबर गुहागर पोलिसांचेही समुद्रकिनारी फेरफटका मारून सुरक्षेविषयी सर्वाधिक लक्ष आहे. शहराला सुमारे सहा किलोमीटरचा विस्तीर्ण स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे.
या किनाऱ्यावर अधिक सक्षमतेने लक्ष ठेवण्यासाठी तसेच समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षा देण्याचे कामही सुरक्षारक्षक व पोलीस यंत्रणा करत आहे. मात्र गुहागर पोलीस ठाण्याकरता आलेले सी प्रहरी इलेक्ट्रिक सायकलिंग मुळे समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा अधिक भक्कम झाली आहे. मुख्यमंत्री यांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शहराच्या समुद्रकिनारी गस्ती करता दोन इलेक्ट्रिक सायकल गुहागर पोलीस ठाण्यात प्राप्त झाले आहेत. या सायकल पूर्ण समुद्राच्या वाळू मधून सहज फिरू शकतात यामुळे पोलिसांची समुद्रकिनाऱ्यावरील गस्त अधिक व्यापक बनले आहे. कोणतीही आघडीत घटना घडल्यास तातडीने सहा किलोमीटरच्या या समुद्रकिनाऱ्यावर पोलीस सहज पोहोचू शकतात.