
अध्यात्म मंदिरात मंदाताई गंधे यांची २० मार्चपासून प्रवचने.
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे येत्या २० ते २२ मार्चदरम्यान अमरावती येथील मंदाताई गंधे यांची प्रवचन मालिका आयोजित केली आहेत. वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत “दुर्गा देवीची रूपे” या विषयावर प्रवचने होणार आहेत.मंदाताई गंधे या देश-विदेशात आध्यात्मिक क्षेत्रात सुपरिचित आहेत. त्या ९१ वर्षांच्या असून, सातत्याने प्रापंचिक लोकांना उपनिषदे, भगवद्गीता, संतवाङ्गय यातील मार्मिकता अत्यंत सोप्या दृष्टांतांसह समजावून आपले दुःखमय जीवन सुखरूप कसे करावे, हे माऊलीच्या वात्सल्याने समजावून सांगतात.
त्यांच्या अमृतवाणीने प्रापंचिक, जिज्ञासू, साधक सर्वांनाच समाधान प्राप्त होते. मंदाताई गंधे यांनी गणित, विज्ञान व संस्कृच्या अध्यापिका नंतर मुख्याध्यापिका, महाराष्ट्र गणित पाठ्यपुस्तक मंडळाच्या संचालक मंडळावर चिटणीस म्हणून वीस-पंचवीस वर्षे काम केले. त्यांच्या प्रवचनाचा लाभ रत्नागिरीकरांनी घ्यावा, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने केले आहे.