
आयोगाची ही कृती राष्ट्रविरोधी; यादीच्या मसुद्यावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर निशाणा
राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केलेली मुंबईच्या मतदार यादीची तारीख २० नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे प्रकाशित झालेल्या यादीपेक्षा वेगळी आहे,आणि ही राष्ट्रविरोधी कृती असल्याचे ठाकरेसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.एक्स वरील एका पोस्टमध्ये ठाकरे म्हणाले, मतदार यादीचा मसुदा अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आला आणि २० नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत अपलोड करण्यात आला.
आधी ती ७ नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्याचे घोषित करण्यात आले होते, परंतु ती १४ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. नंतर अखेर २० नोव्हेंबर रोजी अपलोड करण्यात आली. तरीही, काल आमच्या एका पदाधिकाऱ्याने ही यादी अधिकृतपणे घेतली तेव्हा, प्रकाशित तारीख १४ नोव्हेंबर असल्याचे पाहून आम्हाला धक्का बसला. ही चूक नाहीये, निवडणूक आयोगाची ही देशविरोधी कृती असल्याचा आरोप त्यांनी केला. जर १४ नोव्हेंबर रोजी यादी प्रकाशित झाली होती, तर निवडणूक आयोगाने आठवडाभर ती का रोखून ठेवली होती, असा सवाल ठाकरे यांनी केला.
ते कोणत्या राजकीय नेत्यांच्या आदेशाची वाट पाहत होते का?, त्यांनी यादीत गैरप्रकार घडवून आणण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले होते का?, ती तयार होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली का? २० तारखेला ही यादी अपलोड होण्यापूर्वी आठवडाभर कोणाला ही यादी उपलब्ध होती? असा प्रश्न त्यांनी केले. ही चूक नाहीये, हा गुन्हा आहे. निवडणूक आयोगाने केलेली ही राष्ट्रविरोधी आणि लोकशाही विरोधी कृती असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. आमच्याकडे त्यांचे आणखी गुन्हे आहेत जे आम्ही लवकरच देशासमोर जाहीर करू, असा दावा त्यांनी केला.




