
आनंदी शनिवार’ या संकल्पनेअंतर्गत आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा (इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत) भरतील. ‘आनंदी शनिवार’ या संकल्पनेअंतर्गत त्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणे, स्काऊट गाइड, विविध ठिकाणांना भेटी, विद्यार्थ्यांच्या आवडीचे खेळ घ्यायचे आहेत.असे- शरद गोसावी, संचालक, शालेय शिक्षण विभाग (प्राथमिक), पुणे यांनी माहिती देताना सांगितले आहेशालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण वाढणार नाही, याची खबरदारी घेत आता त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याला प्राधान्य दिले जात आहे. या अनुषंगाने आता सकाळच्या सत्रात (सकाळी साडेसात वाजता) भरणाऱ्या शाळा सकाळी नऊ वाजता भरणार आहेत. दुसरीकडे आठवड्यातील पाच दिवस (सोमवार ते शुक्रवारपर्यंत) विद्यार्थ्यांना पुस्तकी धडे दिले जाणार आहेत. रविवारी तर सुटी असणार आहे, पण आता प्रत्येक आठवड्यातील शनिवारी विद्यार्थ्यांना दप्तराविना शाळेत बोलावले जाणार आहे. त्या दिवशी शाळेत विद्यार्थ्यांच्या आवडीला प्राधान्य दिले जाणार असून कला, खेळ, ऐतिहासिक किंवा प्रेक्षणीय स्थळांना भेटी, स्काऊट गाइड, कथा सांगणे असे उपक्रम शिक्षकांना घ्यावे लागणार आहेत. आठवड्यातील दोन दिवस त्यांना अभ्यासपासून विश्रांती मिळाल्यानंतर ते सोमवारी शाळेत येतील आणि त्यांच्यातील अभ्यास व शाळेबद्दल गोडी वाढलेली असेल, असा विश्वास शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामागे आहे.