
मुंबई-अहमदाबाद मार्गावर रॉकेल सदृश्य कच्च्या तेलाचा टँकर उलटला! टँकर चालकाचा मृत्यू, टँकर कोसळताना पहा व्हिडिओ.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर मस्तान नाका उड्डाण पुलावरून ३० हजार लिटर क्षमतेचा केरोसीन सदृश्य कच्च्या रसायनाचा भरलेला टँकर रविवारी संध्याकाळी खाली कोसळल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी विशेष काळजी घेत हा भाग निर्मनुष्य केला.ह्या अपघातात टँकर चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मस्तान नाका उड्डाणपुलाच्या गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर टँकर पुलाच्या कठड्याला धडकल्यानंतर सुमारे वीस फूट उंचीवरून पुलाच्या खाली कोसळला.अपघात ग्रस्त टँकर मधून केरोसीन सदृश्य कच्च्या तेलाची गळती सुरु झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कच्चे तेल ज्वलनशील नसल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.स्थानिकांच्या मदतीने अपघातात गंभीर जखमी टँकर चालकाला बाहेर काढून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असताना त्याचे उपचारादरम्यान मृत्यू झाला.