राज्य कृषी पणन मंडळ आयोजित पुण्यात पहिल्यांदाच चार ठिकाणी थेट आंबा महोत्सव!

राज्य कृषी पणन मंडळ आयोजित केलेल्या आंबा महोत्सवास चोखंदळ हापूस प्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी ग्राहकांना कोकणातील दर्जेदार, शुद्ध आणि अस्सल ‘यूआयडी टॅग’ प्राप्त आंबा ग्राहकांना आता पुण्यात चार विविध ठिकाणी उपलब्ध झाला आहे.गेल्या १० दिवसांत एक कोटी रूपयांच्या आंब्याची विक्री झाली आहे.

दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेअंतर्गत मार्केट यार्डात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र पुणेकरांसाठी प्रथमच पुणे शहरात मार्केट यार्डसह इतर तीन ठिकाणी आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. ‘जीआय’ आणि ‘यूआयडी टॅग’ लावलेला आंबा ग्राहकांना विकला जात आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असून ग्राहकांचीही फसवणूक होत नाही. या महोत्सवात १५० शेतकऱ्यांना १२० स्टॉल उपलब्ध केले आहेत. त्यात हापूस, केसर, पायरी आणि बिटकी (लहान) आंब्याचा समावेश आहे.यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील भौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेला हापूस आंबा, तसेच राज्यातील केसर, पायरी व इतर वाणांचा आंबा उपलब्ध आहे. महोत्सवात १७५ ते ३०० ग्रॅम वजनाच्या आंब्याची विक्री करण्यात येत आहे.

यात ७०० ते १५०० रुपये प्रति डझन भाव आहे. महोत्सवाच्या पहिल्या १० दिवसांमध्ये १५ हजार डझन आंब्याची विक्री झाली. त्यातून सुमारे एक कोटीची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाने दिली.पणन मंडळामार्फत एक एप्रिल ते ३१ मेपर्यंत मार्केट यार्डातील ‘पीएपीएमएल’च्या बस डेपोजवळ गेट क्रमांक नऊ मार्केट यार्ड, गांधी भवन मैदान-कोथरूड, मगरपट्टा-सिझन्स मॉलजवळ खेळाचे मैदान आणि झेन्सार कंपनीजवळील खेळाचे मैदान, खराडी या चार ठिकाणी आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button