
साज संगमेश्वरी साज’ने केला ५०० प्रयोगांचा टप्पा पार
कोकणातील पारंपरिक लोककलांचे अस्सल संगमेश्वरी भाषेत विनोदी ढंगाने सादरीकरण करून अवघ्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या कोकणचा साज संगमेश्वरी बाज या लोकनाट्याने ५०० प्रयोगांचा टप्पा पार केला. गुहागर तालुक्यातील अडूर भाटलेवाडी येथे सार्वजनिक उत्सवानिमित्त पार पडलेल्या या प्रयोगादरम्यान अनेक संस्था व नाट्यप्रेमींनी या लोकनाट्यातील कलाकारांचा सन्मान केला.
समर्थकृपा प्रॉडक्शनच्या अवघ्या पाच-सहा कलाकारांनी दहा वर्षांपूर्वी सुरू केलेले हे लोकनाट्याचे रोपटे आता सुमारे २२ जणांच्या संचामध्ये बहरले आहे. गिरीश बोंद्रे आणि आनंद बोंद्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या लोकनाट्यातून भजन, जाखडी, नमन आदी लोककलांचे सादरीकरण केले जाते. एक मुंबैकर कोकणातील विविध लोककलांची ‘डॉक्युमेंटरी’ करण्यासाठी कोकणात येतो आणि त्याला कोकणातील विविध इरसाल व्यक्तिमत्वं भेटत जातात. त्यातून कोकणातील लोकसंस्कृतीचं दर्शन घडत जातं, अशी मध्यवर्ती कल्पना घेऊन हे लोकनाट्य पुढे सरकत जाते. नोकरी-उद्योगानिमित्ताने शहराची वाट धरलेल्या कोकणवासीयांमुळे गावची घरं ओस पडत चालली असून कोकणातील उर्वरित मंडळी आपल्या या व्यथा या लोकनाट्यातून मांडतात. व्यवसाय, उद्योगाच्या दृष्टीने कोकण कसे समृद्ध आहे याची आठवण करून देतात. तसेच विकासाच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या कोकणातील जमिनी पाहता भविष्यात स्थानिकांना स्वतःसाठी जागा उरणार नसून परकियांकडे चाकरी करण्याची पाळी येऊ शकेल हे भयान वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला जातो. पात्रांमधील अस्सल ‘संगमेश्वरी’ भाषेतील विनोदी संवाद लोककलांची उंची अधिक वाढवतात. ९८ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात सादर झालेल्या या लोकनाट्याला सुप्रसिद्ध सिनेनाट्य कलाकारांनी भरभरून प्रतिसाद देऊन गौरव केला होता.
या लोकनाट्याचे रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, मुंबई आदी ठिकाणी प्रयोग झाले असून सर्वत्र रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. रविवारी या लोकनाट्याचा ५०० वा प्रयोग अडूर (ता. गुहागर) येथील भाटलवाडीच्या रंगमंचावर सादर झाला. यानिमित्ताने मे. खातू मसाले उद्योग समूह, तसेच अमरदीप परचुरे, अमोद गोळे, निखिल ओक, भाजपा गुहागर तालुका अध्यक्ष नीलेश सुर्वे, पुरळ (देवगड) येथील श्री. गोडसे, नाटक कंपनी चिपळूण, भाटलेवाडी ग्रामस्थ व महिला मंडळ अडूर भाटलेवाडी आदींनी सर्व कलाकारांचा यथोचित सत्कार केला. यावेळी सचिन ओक, उमेश पांचाळ, मुन्ना देसाई, संतोष सनगरे, गणेश राऊत, किरण राठोड, रोहन शेलार, कांता कानिटकर, तसेच गुहागर, रत्नागिरी, चिपळूणमधील नाट्यकलावंत उपस्थित होते.