
रत्नागिरी इंडस्ट्रीज फेडरेशन देणार जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांना पुरस्कार.
फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेतर्फे जिल्ह्यातील उद्योजकांना विविध पुरस्कार देणार असल्याची माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत यांनी दिली. यामध्ये रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट स्टार्टअप् पुरस्कार, रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार -सामाजिक जबाबदारी, जागतिक उद्योजक पुरस्कार, विशेष उद्योजकीय पुरस्कारांचा समावेश आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांनी केलेल्या श्रमाचा, उद्योजकीय कौशल्याचा गौरव करणे, त्यांचे अभिनंदन करणे, जिल्ह्याची अधिक औद्योगिक प्रगती व्हावी म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यात कमीत कमी पाच वर्षे यशस्वीपणे औद्योगिक उत्पादन करून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भर घालणाऱ्या उद्योजकास हा पुरस्कार देण्यात येईल. रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून सीएसआर फंड परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करून समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी उद्योजक किंवा औद्योगिक समुहाला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पुरस्कार देण्यात येईल. जिल्ह्यातील उद्योजक ज्याने 25 वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग केला आहे, नाविन्यपूर्ण कल्पनेच्या माध्यमातून उद्योग यशस्वी केला आहे व सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून विविध उपक्रमात सहभाग घेतला आहे अशा उद्योजकास जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल.
सर्वोत्कृष्ट स्टार्टअप हा पुरस्कार अपवादात्मक नवकल्पना, वाढीची क्षमता उद्योजक वृत्ती, नावीन्यपूर्ण मानके स्थापित करतो, सकारात्मक बदल घडवतो, रत्नागिरी जिल्हा प्रभावित करतो अशा स्टार्टअपना दिला जाणार आहे. जागतिक उद्योजक हा पुरस्कार ज्यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासाची सुरवात रत्नागिरी जिल्ह्यातून केली आहे आणि राज्य देश आणि जागतिक पातळीवर यश मिळवले आहे. विशेष उद्योजकीय पुरस्कार एखाद्या होतकरू उद्योजकाने आपल्या नावीन्यपूर्ण कल्पकतेने उद्योगाच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून उद्योग, व्यापार किंवा शेती या कोणत्याही क्षेत्रात आपले योगदान देऊन आपला ठसा उमटवला आहे. (कुशल, अकुशल स्थानिक कामगारांना, बचतगटांना रोजगार व बाजारपेठ मिळवून दिली आहे.) अशा उद्योजकाला किंवा उद्योजक समुहाला हा पुरस्कार देण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत यांनी दिली.पुरस्कारासाठी उद्योजकाला स्वतः किंवा त्याच्या वतीने इतर कोणताही उद्योजक किंवा संघटनेला अर्ज करता येईल. निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने केली जाईल. पुरस्कार वितरण समारंभात त्यांनी स्वतः उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील उद्योजकांनी २० एप्रिलपूर्वी आपले अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.