
खेडमध्ये शिमगोत्सवात आगळीवेगळी प्रथा, प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून शहराची काढली दृष्ट.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये एक आगळा वेगळा शिमगोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी रात्री १२ वाजता प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्याची प्रथा शेकडो वर्षापासून जोपासली जातेय. हे दुसरं तिसरं काही नसून ही प्रथा म्हणजे शहराची एक प्रकारची काढलेली दृष्टच असते. परंपरेनुसार प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढणे, ही प्रथा खेडमध्ये आजही मोठ्या उत्साहात आणि आनंदात जोपासली जाते.
हुताशनी पौर्णिमेच्या रात्री १२ वाजता पाथाजाई देवीचा होम लागल्यानंतर प्रतीकात्मक मढ सजवले जाते. शास्त्राप्रमाणे त्याचा अंत्यविधीदेखील केला जातो. आणि या प्रतीकात्मक मढ्याची प्रेतयात्रा संपूर्ण शहरभर शहराच्या सीमांवर फिरवली जाते. नंतर मानकर्यांच्या हस्ते या प्रतिकात्मक मढ्याला देवींच्या होमात टाकले जाते. खेडची वर्षभरासाठी इडा पीडा दूर गेली असे समजले जाते. प्रतिकात्मक मढ आणि प्रेतयात्रा काढून केलेला हा कार्यक्रम म्हणजे शहराची काढलेली एक प्रकारची दृष्ट असते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो लोक रात्री उशिरापर्यंत उपस्थित असतात.www.konkantoday.com