रत्नागिरी तापली; पारा 40 अंश पार वाढत्या उन्हात नागरिकांची लाहीलाही

रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली असताना तापमानाने चाळीशी पार केली आहे. मंगळवारी व बुधवारी जिल्ह्यातील सर्वच भागांत तापमान 38 ते 41 अंशांपर्यंत नोंदले गेले. वाढत्या उन्हामुळे नागरिकांचीही लाहीलाही झाल्याचे दिसून आले. शिवाय विजेची मागणीही झपाट्याने वाढू लागली आहे. हा दाह पुढील तीन महिने नागरिकांना सहन करावा लागणार आहे.*सध्या फाल्गुन मास सुरू असून वैशाख वणव्यासारखे उन्हाचे चटके बसू लागल्याने यंदाचा उन्हाळा कडक असणार याची खात्री नागरिकांना झाली आहे. त्याची झलक दररोज अनुभवता येऊ लागली आहे. गेल्या दोन, चार दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान दिवसागणिक वाढू लागलेले आहे. मंगळवारी व बुधवारी सर्वच भागांत तापमान 38 ते 41 अंश सेल्सिअस असे नोंदले गेले आहे. यामुळे नागरिक उष्णतेमुळे कमालीचे हैराण होऊ लागले आहेत. हवामान विभागानेही चार दिवस उष्म्याचे असतील, असा अंदाज यापूर्वीच वर्तविला आहे. बदलत्या हवामानामुळे यावेळी उन्हाळा लवकरच सुरू झाल्याचे जाणवू लागले आहे.

सकाळी 8 पासूनच रत्नागिरीत उन्हाची दाहकता जाणवून येते. दुपारच्या सत्रात तर हा चटका आणखी वाढलेला असतो. त्यामुळे दुपारच्यावेळी अनेक शहरांत, गावात कमालीचा सन्नाटा जाणवतोय. गेल्या आठवडाभरापासून रत्नागिरीत चिपळूण, खेड, देवरुख, राजापूर, लांजा, दापोली आदी प्रमुख शहरात दुपारची वर्दळ कमी जाणवू लागली आहे. संध्याकाळी हे वातावरण निवळत असल्याने नागरिक खरेदी करण्यासाठी संध्याकाळीच जाणे पसंत करताना दिसत आहेत.

वाढत्या उन्हामुळे घशाला कोरड पडण्याचे प्रमाणही वाढू लागल्याने नागरिक तहान भागवण्यासाठी शीतपेयांकडे वळू लागलेले आहेत. यामुळे जागोजागी थंडगार शीतपेयांच्या गाड्या दिसू लागल्यात. शिवाय, आइस्क्रिमच्या दुकानातही गर्दी वाढत आहे. बरेच नागरिक उसाच्या थंडगार रसाला पसंती देत आहेत. शिवाय कलिंगडांनाही मागणी वाढत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button