
कशेडी बोगद्याच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी
राज्याचे गृह निर्माण, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणा मधील महत्वाच्या पोलादपुर ते भरणेनाका दरम्यान असलेल्या कशेडी बोगद्याच्या कामाची महामार्गचे अधिकारी, ठेकेदार पञकारा समवेत पाहणी केली.या बोगद्याचे काम 2020 च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल असा आशावाद पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी यावेळी व्यक्त केला.दरम्यान सद्यस्थितीत दोन्ही बाजूला 150 मीटरचं काम झालं असल्याची माहितीही पालकमंत्री रवींद्र वाईकर यांनी यावेळी दिली.यावेळी पालकमंत्री म्हणाले की कोकणात येण्यासाठी मुख्य महामार्ग म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग.या महामार्गावरील एक अवघड आणि वळवळणाचा घाट म्हणजे कशेडी घाट आहे. होळी आणि गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात याच मार्गाने येत असतात. मात्र वेडीवाकडी वळणे असल्याने या घाटात अपघातांचं प्रमाण वाढत होतं, त्यात या घाटाचे अंतर 34 किमी असल्याने हा घाट पार करण्यासाठी 35 ते 40 मिनिटे लागत होती. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, तसेच वेळ आणि अंतर वाचावं यासाठी पर्याय काढण्याची मागणी जनतेतून होत होती. त्यामुळे या ठिकाणी बोगदा व्हावा या मागणीसाठी मी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला आणि त्याला यश आल्याचं पालकमंत्री यावेळी म्हणाले.ते पुढे म्हणाले की कशेडी बोगदा या कामाची लांबी जवळपास 9 किमी असून त्यामध्ये पावणे दोन किलोमीटरचा लांबीचा बोगदा असणार आहे. यामध्ये एकसमान तीन पदरी दोन बोगदे तसेच या कामाच्या अंतर्गत 7 लहान, 5 मोठे पूल असणार आहेत. दरम्यान दोन्ही बोगद्याच्या 300 मीटर अंतरावर सुरक्षिततेच्या दृष्टीने जोडरस्ता ठेवण्यात आला आहे.या सर्व कामासाठी 743 कोटी रुपये खर्च येणार आहे, पैकी 502 कोटी रुपये खर्च बोगद्याच्या कामासाठी येणार आहे. तर या कामाच्या भूसंपादनावर 84 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.