
संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला
संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी भरघोस निधीची घोषणा सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, तसे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.संभाजीराजांचे स्मारक उभारण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकारी आणि सरदेसाई वाड्याच्या मालकांची बैठक घेतली. यावेळी जागा मालकांनीही याबाबत अनुकूलता दर्शवली आहे.छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळविणार्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा राज्यभर आहेत. त्यामध्ये संगमेश्वरातील कसबा हे प्रमुख ठिकाण आहे.
औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. याच ठिकाणी महाराजांना विश्वासघाताने पकडण्यात आले होते. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणार्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी कसबा येथे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली. यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतुद करण्यात आली आहे.