
चिपळुणात पूररेषेत उभ्या राहताहेत इमारती, माजी नगरसेवक इनायत मुकादम यांचा आरोप.
चिपळूण येथे २००५ साली आलेल्या महापुरानंतर २०१८ साली पूर नियंत्रण रेषा निश्चित करण्यात आली. त्यानंतर २०२१ सालच्या महापुरानंतर निळी व लाल पूररेषा अधिक ठळक करीत शहरात बांधकामे करताना अनेक अटी घालून देण्यात आल्या आहेत. मात्र नगर परिषदेच्या आशिर्वादाने या नियमांचे उल्लंघन करून पूररेषेत इमारती उभ्या राहत असल्याचा आरोप माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी केला आहे, अशी तक्रार जिल्हाधिकार्यांकडे करीत याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.याबाबत माहिती देताना मुकादम म्हणाले, २००५ साली येथे महापूर आल्यानंतर त्याची शासनाने कारणे शोधली.
यात नदीकाठी अनधिकृतपणे बांधकामे झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे ३ मे २०१८ साली महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने पूरनियंत्रण रेषा निर्बंधाबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. त्यात अनेक मार्गदर्शक सूचना व पूर नियंत्रण रेषा निर्बंधनाची सविस्तर माहिती आहे. असे असताना नगर परिषद क्षेत्रात पूर नियंत्रण रेषा निर्बंधाचे उल्लंघन करून प्रशासनाच्या आशीर्वादाने अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवाजीचौक चिंचनाका येथील बहुमजली इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून या इमारतीचे दर्शनी भागाच बांधकाम मुख्य रस्त्यावरच असल्याचे दिसून येते.www.konkantoday.com