नवीन ‘नंबर प्लेट’ लावणारे सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य!

नागपूर : सायबर गुन्हेगारांनी आता वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचआरएसपी) लावण्यासाठी धडपड करणाऱ्या वाहनचालकांना लक्ष्य केले आहे. ‘एसआरएपी’ नोंदणी करण्यासाठी ‘लिंक’ पाठवत असून त्याद्वारे अनेकांचे बँक खाते रिकामे करीत आहे. पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक शहरातील अनेकांना सायबर गुन्हेगारांनी गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारने २०१९ पूर्वीच्या २ कोटी १० लाख वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचआरएसपी) लावणे बंधनकारक केले आहे. येत्या एप्रिलपासून उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचआरएसपी) न लावणाऱ्या वाहनचालकांवर १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक जण ऑनलाइन नोंदणी करण्यात व्यग्र आहेत. अनेक जण नवीन नंबर प्लेट लावण्याच्या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अनेक वाहनचालक समाजमाध्यमांवर येणाऱ्या संदेशांचे बळी पडत आहे. ‘उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटसाठी नोंदणी करा एका मिनिटात आणि मिळवा घरबसल्या नवीन नंबर प्लेट,’ असा संदेश पाठवून खाली ‘लिंक’ पाठवण्यात येत आहे. असे संदेश पाठवणारे दुसरे-तिसरे कुणी नसून चक्क सायबर गुन्हेगार आहेत.व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आलेल्या लिंकवर क्लिक केल्यास सुरुवातीला वाहनांची माहिती विचारली जाते. त्यानंतर बँकेतील खात्याची माहिती भरण्यास बाध्य केले जाते. उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटची नोंदणी झाल्याचे दर्शवून एटीएम कार्ड, डेबिट कार्डचा क्रमांक आणि पासवर्ड मागण्यात येत आहे.

पटकन नंबर प्लेट मिळवण्याच्या नादात अनेक जण ‘लिंक’वर मागितलेली माहिती देतात. त्यानंतर सायबर गुन्हेगार अशा वाहनचालकांच्या बँक खात्यातील रक्कम लंपास करीत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे.नव्या नियमानुसार वाहनांना नंबर प्लेट बसवण्यासाठी कोणत्याही लिंकवर ‘क्लिक’ करून सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नका. नियमानुसार शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करा.

साबयर गुन्हेगारापासून सतर्क राहा. – *लोहित मतानी, पोलीस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा

ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सरकारने नियुक्त केलेल्या अधिकृत एजन्सींच्या ‘ऑनलाइन पोर्टल’वर जाऊन आपल्या वाहनाची माहिती नोंदवावी लागते. उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटसाठी (एचआरएसपी) ‘अपॉइंटमेंट बुक’ करावी लागते. नोंदणीदरम्यान वाहनाच्या तपशिलांची सत्यता अधिकृत पोर्टलद्वारे तपासली जाते. त्यानंतर निर्धारित तारखेला आपल्या वाहनावर ‘एचएसआरपी’ बसवण्यासाठी नियुक्त केंद्रावर वाहन घेऊन जावे लागते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button