
श्री देव भैरी शिमगाेत्सव घरबसल्या पाहता येणार
रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. वर्षभर ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी मंदिरात जावे लागते, परंतु शिमगोत्सवात ग्रामदेवता पालखीत बसून भाविकांच्या भेटीला येते, हे विशेष. घरोघरी पालखी येत असल्यामुळे नोकरी-व्यवसायासाठी बाहेरगावी असलेली मंडळी शिमगोत्सवासाठी आवर्जून गावी येतात.

मात्र काहींना गावी येणं शक्य होत नाही, त्यांना घरबसल्या मोबाईलवर रत्नागिरीतील श्री भैरीचा शिमगोत्सव लाईव्ह पाहण्याची संधी रत्नागिरी फोटोग्राफर्सं उपलब्ध करून देणार आहेत.बारा वाड्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरीचा शिमगोत्सव दि. १३ मार्चपासून साजरा होणार आहे. दि. १३ रोजी श्री देव भैरीची पालखी रात्री मंदिराबाहेर पडणार आहे. याचवेळी मंदिरात नवलाई, पावणाई या पालख्यांची भेट होते. हा अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी भाविक आतुर असतात. मंदिर परिसरात प्रचंड गर्दी होते. मात्र प्रत्येकाना येणे शक्य नसते, त्यांना रत्नागिरीतील फोटोग्राफर्स यांच्या माध्यमातून शिमगा घरबसल्या पाहता येणार आहे. गेले अनेक वर्षे रत्नागिरी फोटोग्राफर्स लाईव्ह प्रक्षेपण सुविधा उपलब्ध करत आहेत. या उत्सवासाठीच्या लाईव्हच्या पोस्टरचे अनावरण रविवारी (दि.९) श्री देव भैरी मंदिरात देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांचा हस्ते करण्यात आले.

या पोस्टरवर दि.१३ आणि दि. १४ मार्च या दोन दिवस होणाऱ्या लाईव्हचा क्यू. आर. कोड लावण्यात आला आहे. तरी नागरिकांनी या कोडला स्कॅन करून भैरीचा शिमगा लाईव्ह पहावा, असे आवाहन रत्नागिरी फोटोग्राफर्सतर्फे करण्यात आले आहे. पोस्टर अनावरण सोहळ्यास परेश राजिवले, साईप्रसाद पिलणकर, मयुर दळी, अमित आंबवकर, प्रशांत निंबरे, सुशांत सनगरे, यश चव्हाण, निरंजन तेरेदेसाई, अनिकेत दुर्गवली, श्री तारवे, निलेश कोळंबेकर, प्रसाद शिगवण, सचिन शिंदे उपस्थित होते.