
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात रास्त दराच्या धान्य दुकानातून साडीवाटपाचा कार्यक्रम.
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रास्त दराच्या धान्य दुकानातून साडीवाटपाचा कार्यक्रम शासनाने सुरू केला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ३८ हजार १४२ अंत्योदय कुटुंबांना मोफत साडीचे वाटप होणार आहे.१३ मार्चपूर्वी हे वाटप होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.कॅप्टिव्ह मार्केट योजनेंतर्गत राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी वाटप करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील १३ गोदामांमध्ये आवश्यक साड्या पोहोचल्या असून, बहुतेक रास्तदर धान्य दुकानातून साडीचे वाटप सुरू झाले आहे. जिल्ह्यात सर्वांत कमी साड्यांची संख्या पाली गोदामाशी जोडलेल्या दुकानांमध्ये आहे. तिथे ४७४ साड्या वाटप करण्यात येणार आहेत.
चिपळूण गोदामाला सर्वाधिक साड्या उपलब्ध असून तेथे ६ हजार २५१ साड्या दुकानांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने अंत्योदय कुटुंबांना सुरू केलेले साडी वाटप शिमगोत्सवापूर्वी म्हणजे १३ मार्चपूर्वी व्हावे, असे प्रयत्न पुरवठा विभागाने सुरू केले आहेत. प्रत्येक दुकानदाराला साडी वाटप करण्याविषयी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. या साड्या ई-पॉस मशिनद्वारेच वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.