
तारामुंबरी- मिठमुंबरी पुलावरून अखेर एसटी सुरू.
देवगड तालुक्यातील पर्यटनाचा सेतू ठरलेला तारामुंबरी-मिठमुंबरी पुल सुरू होवून सात वर्षे झाली.या पुलावरून खासगी वाहतूकही सुरू झाली. मात्र एसटी वाहतूक सुरू झाली नव्हती. अखेर गुरूवारपासून ही एसटी वाहतूक सुरू झाली व ग्रामस्थांचा मागणीला सात वर्षानंतर यश आले.गुरुवारी देवगड आगारातून तारामुंबरी-मिठमुंबरी पूलमार्गे कुणकेश्वर या एसटी फेरीचा शुभारंभ आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला.
स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर, वाहतूक नियंत्रक तुकाराम देवरूखकर, चालक व्ही. एस्. उन्हाळकर, वाहक पी. पी. घाडी आदी कर्मचारी व प्रवाशी उपस्थित होते. सध्या या मार्गावरून कुणकेश्वरकडे जाण्यासाठी एस्टीचा तीन फेर्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये सकाळी 9.30 वा., दुपारी 1 वा. व सायं. 5.30 वा. अश्या देवगड- कुणकेश्वर या तीन एसटी फेर्या धावणार आहेत. पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने मिठमुंबरी, कुणकेश्वरमधील विद्यार्थी व प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे