बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रत्नागिरीत १० मार्च रोजी वुमेन्स फेस्टचे आयोजन सौ. उमा प्रभू, अभिनेत्री संपदा जोगळेकरांची उपस्थिती फॅशन शो वेधणार लक्ष

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिटयूटचे (BKVTI) मारुती मंदिर येथील एस. बी. नलावडे कमर्शिअल सेंटर येथील वास्तूत स्थलांतर होणार आहे. यानिमित्त येत्या १० मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच वेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वुमेन्स फेस्ट कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून इफको टोकियोच्या संचालक व मानव विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा सुरेश प्रभू आणि विशेष अतिथी सुप्रसिद्ध अभिनेत्री व कृषी उद्योजिका सौ. संपदा जोगळेकर-कुळकर्णी या उपस्थित राहणार आहेत.यानिमित्त माळनाका येथील जयेश मंगल पार्क येथे वुमेन्स फेस्ट हा भव्य कार्यक्रम होणार आहे.

१० मार्च रोजी दुपारी दुपारी २:३० वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होणार आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योग तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा गौरव केला जाणार आहे. सहभागी उद्योगिनी महिलांच्या उद्योगांचे निवडक स्टॉलचे प्रदर्शनही असणार आहे. या वेळी मान्यवर प्रमुख पाहुणे व सेलिब्रेटी अतिथी यांची उपस्थिती व संवाद असा कार्यक्रम होईल. याच कार्यक्रमात पुण्याच्या मणीलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील (MNVTI) विद्यार्थिनी भव्य फॅशन शो सादर करणार आहेत. सर्व महिला भगिनींसाठी कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य आहे.शिरगाव येथे बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतात. यामध्ये विविध फूड प्रोसेसिंग- पाककृती, खाद्यपदार्थ, मोदक, केक, सरबत, लोणचे बनवण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच शिवणकामाचेही व फॅशन डिझाईन प्रशिक्षण, तसेच ब्युटी पार्लर मधील विविध अभ्यासक्रम व उपक्रम राबवले.

महिला सक्षमीकरणासाठी ही संस्था कार्यरत असून या संस्थेचा बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (BKVTI ) हा एक विभाग आता रत्नागिरीमध्ये मध्यवर्ती ठिकाणी मारुती मंदिर येथील सुसज्ज वास्तूत स्थलांतरित होत आहे.नवीन ठिकाणी ब्युटी पार्लर, फॅशन डिजाईन, फूड प्रोसेसिंग व ट्रॅव्हल्स टुरिझम व हॉस्पीटीलिटीचे अद्ययावत अभ्यासक्रम व वर्कशॉप राबवले जाणार आहेत. यामुळे आता रत्नागिरी शहरातच महिलांना नवनवीन कोर्सेस करणे शक्य होणार आहे.

या निमित्ताने होणाऱ्या या वुमेन्स फेस्ट कार्यक्रमाला व भव्य फॅशन शो या कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा व परिसरातील जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपकार्याध्यक्ष व प्रकल्प अध्यक्षा सौ. विद्या कुलकर्णी, रत्नागिरी प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई, समन्वयक स्वप्नील सावंतदेसाई आणि स्थानिय व्यवस्थापन सदस्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button