आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाला अनुलक्षून रत्नागिरीत नागरी व पगारदार संस्थांची कार्यशाळा संपन्न

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्ताने सहकार खाते रत्नागिरी व जिल्हा पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रत्नागिरीत कार्यशाळा पार पडली. ११४ पतसंस्थांचे २५२ प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्री.मांडरे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, सौ.मुग्धा करंबेळकर, श्री.साहेबराव पाटील तसेच श्री. संतोष थेराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पतसंस्थांची कार्यशाळा अत्यंत उत्साहात पार पडली.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पुण्य पुरुषांच्या प्रतिमांना पुष्पांजली वहाण्यात आली.

त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. श्री.संतोष थेराडे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगत उपस्थित संस्था प्रतिनिधींचे स्वागत केले.या जिल्ह्यातल्या सहकार हा गर्दीचा नसला तरी सहकाराची विण येथे पक्की आहे. सहकारी संस्थांनी शासकीय धोरण, नवनवे बदल आत्मसात करून आपली कार्यपद्धती अधिक विकसित करावी. सहकार खातं सर्व संस्थांच मित्र अशा स्वरूपात काम करेल असं सांगत संस्थांनी आपली विश्वासार्हता अधिक ठळक करावी. नेटकेपणा, नवतंत्रज्ञान याचा वापर यावर भर द्यावा असे सांगत या सहकार वर्षात प्रत्येक तालुक्यात सहकार जागृतीसाठी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन डॉ.शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले.श्री.साहेबराव पाटील सहाय्यक निबंधक यांनी आर.टी.एस अंतर्गत सेवा सहकारी संस्थांना कशा सुलभ उपलब्ध आहेत हे सांगितले तसेच नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेत तयार झालेल्या या सेवा प्रणाली ऑनलाईन पद्धतीने अनेक सेवा सहकारी संस्थांना देत आहेत याबद्दल विश्लेषण साहेबराव पाटील यांनी केले.

ऑडिटचे नवे निकष व तयारी या संदर्भात सौ.मुग्धा करंबेळकर यांनी विस्तृत विवेचन केले. लेखापरीक्षणाचे गुण प्राप्त करण्यासाठी अंतिम वेळी धावाधाव न करता आपली कार्यपद्धती विकसित करून वेळेचे वेळी निकष पूर्तता होईल, रेकॉर्ड उत्तम राहील याची काळजी घ्या हे सांगत लेखापरीक्षकाचा तपासणीचा भर कुठे असतो त्यावर प्रकाश टाकला व सहकार खात्याचे गुणपत्रक त्यातील मुद्दे अधोरेखित केले. आपल्या प्रमुख मार्गदर्शनात ॲड.दीपक पटवर्धन यांनी ३१ मार्च ची तयारी हा विषय मांडला. वसूली यंत्रणा कशी सजग ठेवावी हे सांगत थकबाकीदारांची वर्गवारी कशा पद्धतीने करावी याचे तपशीलवार विवेचन केले. वसुली बरोबरच बॅलन्सशीट संदर्भाने विविध तरतुदी आणि त्यांची गुंतवणूक एस.एल.आर गंगाजळी यांची गुंतवणूक, विविध तरतुदींच्या स्वतंत्र गुंतवणुका, घसारा, आकारणी, देय व्याजाचे हिशेब, गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाचे कॅल्क्युलेशन, बँकेमधील पासबुक अपडेट करण्याची गरज, ३१ मार्च अखेर गुंतवणुकीवर प्राप्त होणाऱ्या व्याजाची माहिती वेळीच मागणी करण्याची कार्यपद्धती या संदर्भाने अंतिम महिन्यातील व्यवस्थेचे प्लॅनिंग कसे असावे याबाबत विस्तृत विवेचन केले.

पतसंस्थांनी ३१ मार्चच अतिरिक्त टेन्शन न घेता तो महोत्सव कसा होईल हे पहावे. ३१ मार्च हा आपल्या उद्दिष्ट पूर्तीचे माध्यमातून एक शानदार महोत्सव म्हणून प्रत्येक संस्थेने साजरा करावा असे आव्हान प्रतिनिधींना केले. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे निमित्ताने सहभागी सर्व ११४ संस्था प्रतिनिधींना स्मृतिचिन्ह देण्यात आले. हया आयोजनासाठी स्वामी स्वरूपानंद पतसंस्था, मुरली मनोहर पतसंस्था, शिववैभव पतसंस्था यांचे विशेष सहकार्य लाभले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मोहन बापट यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री.हेमंत रेडीज यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button