
रिफायनरीप्रकल्पाला आधीपेक्षा दहा पटीने तीव्र विरोध करू,बारसू-सोलगाव पंचक्रोशीतून पुन्हा एकदा प्रकल्पविरोधी लढय़ाची ठिणगी पडली
रिफायनरी प्रकल्प बारसूलाच होणार’ अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर बारसू-सोलगाव पंचक्रोशीतून पुन्हा एकदा प्रकल्पविरोधी लढय़ाची ठिणगी पडली आहे. या प्रकल्पाला आधीपेक्षा दहा पटीने तीव्र विरोध करू, असे ठणकावतानाच ‘आधी आम्हाला सर्वांना गोळय़ा घाला, नंतरच रिफायनरी प्रकल्प करा’, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.रत्नागिरी जिह्यात राजापूरमधील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा कडाडून विरोध आहे. त्याबाबत गावांनी ठरावही केलेले आहेत. 25 एप्रिल 2023 रोजी येथे आंदोलनाचा भडका उडाला होता. बारसूच्या माळरानावर प्रकल्पासाठी माती परीक्षण केले जाणार होते. ते ग्रामस्थांनी हाणून पाडले. तेव्हा आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज केला होता. त्यानंतर या प्रकल्पाबाबत सरकार बॅकफूटवर गेले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा हा प्रकल्प पुढे रेटला असून हरित रिफायनरी बारसूतच होणार, असा पवित्रा घेतल्याने त्याचा गावकऱयांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
बारसू सोलगाव रिफायनरीविरोधी संघटनेने पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.