
मंडणगडात शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला; दहा लाखांची मागणी करत दिली जीवे मारण्याची धमकी.
जनावरे चरविण्यासाठी घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्यावर चारचाकी गाडीतून आलेल्या टोळक्याने पाठीत चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना शेनाळे (ता. मंडणगड) येथे २३ फेब्रुवारी राेजी सकाळी घडली.या टाेळक्याने शेतकऱ्याच्या गळ्यातील सुमारे सात तोळ्याची सोन्याची चेन हिसकावत, दहा लाखांची मागणी केली. तसेच, ठार मारण्याची धमकीही दिली.
याबाबतची फिर्याद संतोष बाबू कुटेकर (४४, रा. शेनाळे, ता. मंडणगड) यांनी मंडणगड पोलिस स्थानकात दिली आहे. त्यानुसार नथुराम शिनगारे, प्रकाश शिनगारे, सदानंद जऊल, सचिन शिनगारे, संतोष अबगुल, रविराज शिनगारे, दीपक पेंढारे, अनंत महाडिक, स्वप्नील जऊल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नथुराम शिनगारे यांच्यासह नऊ जण संताेष कुटेकर यांना १७ व १८ फेब्रुवारी राेजी वाकवली गावकीच्या बैठकीसाठी बाेलवत हाेते. मात्र, या बैठकीला जाण्यास संताेष कुटेकर यांनी नकार दिला. त्यानंतर नथुराम शिनगारे हे त्यांना सतत फाेन करुन भेटण्यासाठी बाेलवत हाेते.
मात्र, त्यांनी भेटण्यास नकार दिला.त्यानंतर संतोष कुटेकर हे २३ रोजी जनावरे चरविण्यासाठी जात असताना सकाळी ७:४५ वाजता शेनाळे घाटातील उमा बाग येथे म्हाप्रळकडून मंडणगडकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीतून नथुराम सिनगारे उतरला व त्याने दहा लाखाची मागणी केली. त्यानंतर गाडीतून अन्य चाैघे उतरले आणि पाचजणांनी त्यांना घेरले. त्यानंतर एकाने त्यांच्या पाठीत चाकूचे वार केले. दुसऱ्याने पायावर टॉमीने मारहाण केली. तर, एकाने गळ्यातील सात तोळ्याची सोन्याची चेन खेचून काढली. त्यानंतर कुटेकर यांनी हिसका देऊन तिथून जंगलात पळ काढला. त्यानंतर ते घरी आले आणि तिथून त्यांना उपचारासाठी मंडणगड प्राथमिक रुग्णालयात दाखल केले हाेते.