
सिंधुरत्न समृध्द योजनेच्या फलनिष्पत्तीबाबत आढावा बैठकजिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीसाठी योजना ; स्थानिक रोजगारात वाढ – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. 21 : गेल्या तीन वर्षापासून रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये आर्थिक विकास व्हावा व जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे, यासाठी सिंधुरत्न समृध्द योजना राबविण्यात आली. या योजनेच्या मूल्यमापन अभ्यासाकरिता आज यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे यांच्या संशोधन सहयोग व सल्लासेवा केंद्र यांची जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या योजनेत राबविण्यात आलेल्या योजना या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने घेण्यात आल्या त्यामुळे त्यामुळे स्थानिक रोजगारात वाढ झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज झालेल्या या बैठकीस यशदा चे संचालक सुमेध गुर्जर, समन्वयक अधिकारी प्रज्ञा दासरवार, संशोधन अधिकारी अजित करपे उपस्थित होते. सिंधुरत्न कार्यकारी समितीचे विशेष निमंत्रित सदस्य अजित यशवंतराव हे दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी यांनी योजनेशी संबंधित प्रमुख विकास क्षेत्रनिहाय जिल्ह्याचे एकत्रित सादरीकरण केले. सदर सादरीकरणामध्ये शासनाच्या दि.२२ मार्च,२०२२ च्या शासन निर्णयानुसार मंजूर अनुदानाला अनुसरुन कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, वने, व महिला व बालविकास इ. विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांची यंत्रणानिहाय सविस्तर माहिती दिली. तसेच सिंधुरत्न समृध्द योजनेत राबविण्यात आलेल्या योजना या जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने घेण्यात आल्या असून, त्यामुळे स्थानिक रोजगारात वाढ झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मंजूर निधीच्या अनुषंगाने उर्वरित निधी प्राप्त झाल्यास योजनेचे उद्दिष्ट सफल होईल. ही योजना महत्त्वपूर्ण असून, यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांचा आर्थिक विकास होणार असल्याने ही योजना पुढे सुरू ठेवण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सिंधुरत्न योजनेतून रोजगार वाढीच्या अनुषंगाने, टूरिस्ट बस, हाऊस बोट, मच्छीमार व्यवसायिकांना कुलिंग व्हॅन, बिगर यांत्रिकी नौका बांधणे, ई-स्कूटर, तसेच शेतकऱ्यांना मोफत भात, नागली व भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले. आंबा बागायतदारांना बोलेरो गाड्या, फळमाशी सापळे, देण्यात आले आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मालगुंड येथे होणारे प्राणी संग्रहालय हा नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
श्री. यशवंतराव यांनी योजना लोकोपयोगी व चांगली असून, ती पुढे सुरू रहावी. तसेच त्याचा उपयोग सर्व नागरिकांना व्हावा यादृष्टीने संबंधित सर्व विभागांनी कामकाज करावे, अशी सूचना केली. तसेच जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायाला वाव असून, शेती पूरक व्यवसाय म्हणून याचा समावेश व्हावा, असे सांगितले.
श्री. गुर्जर यांनी योजनेच्या मुल्यमापनाबाबत सविस्तर माहिती दिली, सदरचे मुल्यमापनाचा उद्देश केवळ खर्चाचा ताळमेळ घेणे असा नसून योजनेत सुसुत्रता, योजनांची सांगड व पर्यावरणक्षम शाश्वत विकास करणे असा आहे. तसेच, योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी, त्याचा फायदा सामान्य नागरिकांना व्हावा, याकरिता योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांसमवेत ४ दिवसांची विभागनिहाय कार्यशाळा घेण्याचे प्रयोजन आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर राबविण्यात आलेल्या योजनेतील संबंधित लाभार्थ्यांबरोबर चर्चा केली व योजनेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानून बैठक संपल्याचे जाहीर केले.
000