
रत्नागिरी येथील मांडवी बंदरात पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करा
रत्नागिरी येथील मांडवी बंदर हे स्थानिक आबालवृद्धांसह पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. तथापि येथे अजूनही पर्यटनवाढीसाठी आवश्यक त्या मूलभूत, प्रगत सुविधा नाहीत. त्यामुळे विविध उपाययोजनांबाबतचे निवेदन हॉटेल व्यावसायिक संघटनेच्यावतीने रत्नागिरी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मांडवी किनाऱ्यावर स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम्स, कचराकुंड्या हव्यात. नियमित साफसफाईसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. मांडवीत सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी तसेच सूचनाफलक व तातडीच्या सुविधांची उपलब्धता करावी. स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स व हस्तकला, लोककलेचे मेळावे असावेत. जेट स्कींग, बोटराइड्स, स्कुबा डायव्हिंगची सुविधा दिल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल. पार्किंगसाठी स्वतंत्र जागेची सोय असावी तसेच शटल सेवा, बस व रिक्षांची उपलब्धता असावी. वृक्षारोपण आणि समुद्रजीवन संवर्धन कार्यक्रम राबवावा.
मांडवी येथे संगीत, नृत्य व फूड फेस्टिव्हलचे आयोजन केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल, अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. यावर नगरपालिकेकडून सकारात्मक पावले उचलण्यात यावीत, असे आवाहनही हॉटेल व्यावसायिकांनी केले आहे.