
महिलांनी कायदेशीर हक्काबाबत जागरुक व्हावे- जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे
रत्नागिरी, दि. 24 ):- महिलांनी कायदेशीर हक्काबाबत जागरुक व्हावे. जोपर्यंत समाजातील सर्व स्तरावरील महिलांमध्ये महिला कायदेविषयक जागरुकता होणार नाही, तोपर्यंत विविध संरक्षण यंत्रणांना त्यांना सहजरित्या मदत करणे शक्य होणार नाही. तरी महिलांनी आपल्या हक्कांबद्दल जागरुक राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती, वकील संघ चिपळूण व गुरुकुल कॉलेज खेर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने 23 सप्टेंबर रोजी महिलांमध्ये कायदेविषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.
यावेळी जिल्हा न्यायाधीश डॉ. नेवसे यांनी घटनेने दिलेले अधिकार व महिलांविषयी असलेल्या विविध कायद्यांच्या तरतुदींबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. सध्याच्या जीवन शैलीतील बदल, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महिलांच्या जटील समस्या व त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अस्तित्वात आलेले प्रगल्भ कायदे, महिलाविषयक शासनाच्या विविध योजना, मा. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या विविध न्याय निवाड्यातील महिलांबाबतचे संरक्षण आदेश व मार्गदर्शक तत्त्व याबाबत सखोल माहिती दिली. दिवसेंदिवस महिलांविषयक समस्या जेवढ्या जटील होत आहेत तेवढेच कायदे देखील प्रगल्भ होत आहेत. सध्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांमध्ये आता मोबाईल, लॅपटॉप इत्यादी देखील अंतर्भूत झाले आहेत व त्याचा परिणाम म्हणजे महिलांविरुध्द विविध प्रकारच्या लैंगिक गुन्ह्यामध्ये प्रकर्षाने होणारी वाढ याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. तसेच विविध कायद्यांबाबत माहिती देताना महिलांच्या सुरक्षितता आणि गोपनीयतेबाबत विशेष जागरुकता व कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायद्यांच्या महत्वपूर्ण तरतुदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या.
चिपळूण वकील संघाचे अध्यक्ष अॕड. नितीन सावंत यांनी पोक्सो कायद्याच्या विविध तरतुदी, शिक्षेचे स्वरुप विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करतांना घ्यावयाची काळजी याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. तालुका विधी सेवा समिती चिपळूण यांच्यातर्फे ‘कायद्यांची ओळख’ या पुस्तिकेचे वाटप केले. कार्यकमाचे सूत्रसंचलन विद्यार्थी प्रतिनिधी स्नेहा शिंदे हिने केले. कार्यक्रमासाठी गुरुकुल कॉलेजचे विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




